कामकाजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : तातडीने रस्ताकाम पूर्ण करण्याची मागणी
वार्ताहर /किणये
बेळगाव-चोर्ला रोडवरील हुंचेनहट्टी क्रॉसनजीक गेल्या पंधरा दिवसापासून रस्ताकाम करण्यासाठी खोदाई करून ठेवली आहे. मात्र सदर कंत्राटदाराचे या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. रस्ता अर्धवट स्थितीत असल्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या दुकानदारांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हुंचेनट्टी क्रॉसपासून बेळगाव-चोर्ला या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूने खोदाई करण्यात आली आहे. मात्र त्याचे कामकाज पूर्ण केले नाही. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विविध प्रकारच्या दुकानांमध्ये ये-जा करताना ग्राहकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे व्यापारीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव शहर स्मार्ट सिटी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पिरनवाडीपासून व्हिटीयूपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणही सुरू करण्यात आले आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून ही जमेची बाब आहे. मात्र हुंचेनहट्टी, पोलीस क्वार्टर्सनजीक रस्ता खोदाई करून कामकाज पूर्ण का करण्यात येत नाही, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. रस्त्याची खोदाई केल्यामुळे दुकानात येणारे ग्राहक अनेकवेळा पडून त्यांना किरकोळ दुखापतही झाल्याची माहिती काही जणांनी दिली.
ग्राहकांना नाहक त्रास
रस्ता खोदाई करण्यात आली आहे. याचे कामकाज अर्धवट आहे. रस्त्याच्या बाजूलाच आमचे स्वीटमार्टचे दुकान आहे. मात्र अर्धवट खोदाई करून ठेवलेला रस्ता असल्यामुळे ग्राहकांना येताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बरेचसे ग्राहक खोदाई केलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पडलेले आहेत. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे.
– गजानन मुतगेकर









