बेळगाव : कित्येक दिवसांपासून रखडलेल्या शनिवार खूट येथील गटारीच्या कामासाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. गटारीच्या नवीन बांधकामामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. शिवाय पावसाळ्यातील समस्याही दूर होणार आहे. शनिवार खूट येथील गटार चार ते पाच फूट खोल होती. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण होते. शिवाय गटारीची साफसफाई करणेही अशक्य होते. त्यामुळे गटारीत माती, कचरा आणि प्लास्टिकची समस्या निर्माण झाली होती. दरम्यान याठिकाणी नवीन गटार बांधावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत शनिवार खूटपासून काकतीवेसकडे जाणाऱ्या एका बाजूच्या गटारीची खोदाई केली आहे. याठिकाणी आता काँक्रीटची गटार तयार केली जाणार आहे.
नवीन गटार बांधण्याला प्राधान्य
शहरात अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्या, ड्रेनेज आणि इतर विकासकामे केली जात आहेत. त्याबरोबर गटार आणि नाल्यांच्या कामालाही चालना दिली आहे. आता नवीन गटार बांधण्याला प्राधान्य दिले जात आहे.









