शेतकऱ्यांची मागणी : जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
बेळगाव : बळ्ळारी नाल्याचा विकास केला जाईल, असे आश्वासन अलीकडेच लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात बळ्ळारी नाल्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण नाल्यात गाळ साठण्यासह जलपर्णीनी वेढा घातला आहे. परिणामी सांडपाणी वाहून जात नसल्याने यंदाही पावसाळ्यात परिसरातील शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष घालून बळ्ळारी नाल्याची खोदाई व सफाई करावी, अशी मागणी केली आहे. येळ्ळूर रोडपासून सुरू होणारा बळ्ळारी नाला परिसरातीलच शेतकरी नव्हे तर दोन किलो मीटरवरील जनतेला ‘वरदान नसून शाप’ ठरला आहे.
बळ्ळारी नाल्याचा विकास करण्यात येईल, असे सांगत गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखविले जात आहे. शेतकऱ्यांसाठी आखलेल्या अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. बळ्ळारी नाल्याचा विकास करण्यासह पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात यावी, यासाठी शेतकरी दरवर्षी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासह आंदोलन करतात. अधिकारी व लोकप्रतिनिधीही नाल्याला भेट देऊन विकास करण्याचे आश्वासन देत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र काहीच होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हजारो रुपये खर्ची घालून शेतीची मशागत करण्यासह पिकांची पेरणी केली जाते. मात्र पावसाळ्यात पुराचे पाणी बळ्ळारी नाल्याबाहेर येऊन शिवारात शिरत असल्याने शेती पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. नाल्यात गाळ साचण्यासह जलपर्णीने वेढा घातला आहे.
पंचनामाही नावापुरताच
सरकारने बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी निधी मंजूर करून काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात होते. पण पावसाळा जवळ आला असला तरी अद्यापही बळ्ळारी नाल्याच्या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करत आहेत. पण शासनाकडून मिळणारी भरपाईची रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे.
संभाव्य परिस्थिती ओळखून कामे राबवा
मध्यंतरी लोकसभा निवडणुकीपुर्वी येळ्ळूर रोड ते पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गापर्यंत नाल्यातील गाळ व जलपर्णी काढण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी दिलासा मिळाला होता. त्या काळात काही प्रमाणात खरीप व रब्बी पिके घेण्यास शेतकऱ्यांना सोयीस्कर झाले. यंदा हवामान खात्याने मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाळ्यापूर्वी बळळरी नाल्याच्या सफाईचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. बळळरी नाल्याला पूर आल्यास शहापूर, वडगाव, माधवपूर, जुने बेळगाव, येळ्ळूर, बेळगाव, धामणे, मच्छे, हालगा, बस्तवाड, मजगाव, अनगोळसह परिसरातील शिवार जलमय होते. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्याचे खोदाई करण्यासह गाळ व जलपर्णी काढावी, अशी मागणी केली जात आहे.









