एलअँडटी-केयुआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांची बैठकीला दांडी
बेळगाव : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था आणि समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महापौरांनी गुरुवारी एलअँडटी आणि केयुआयडीएफसी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक बोलाविली होती. मात्र सदर बैठकीला दोन्ही विभागांचे अधिकारी गैरहजर राहिले. केवळ कर्मचारीच बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त करत अधिकारी न आल्याने बैठक रद्द करावी, अशी मागणी केली. त्यावेळी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे सांगत याबाबत दोन्ही विभागांच्या मुख्य कार्यालयांना पत्रव्यवहार केला जाईल,
तसेच 3 एप्रिल रोजी पुढील बैठक घेण्यात येणार असून सदर बैठकीला अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी आवश्यक माहितीनुसार बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना केली. शहरातील 58 प्रभागांमधील पाणीपुरवठा व्यवस्था आणि समस्या जाणून घेण्यासाठी महापौर मंगेश पवार यांनी गुरुवारी दुपारी 12 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार कौन्सिल विभागाकडून सर्व नगरसेवक, एलअँडटी, तसेच केयुआयडीएफसीच्या कार्यालयांना बैठकीची नोटीस पाठविण्यात आली होती. बुधवार दि. 26 रोजी नोटीस देण्यासह वैयक्तिकरित्या फोनवरूनही बैठकीची माहिती देण्यात आली होती.
मात्र गुरुवारच्या बैठकीला दोन्ही विभागांचे केवळ कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी गैरहजर राहिल्याने बैठक सुरू होण्यापूर्वीच नगरसेवकांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. शहरात पाणी समस्या गंभीर बनली असल्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर कोण देणार? असे म्हणत उपस्थित कर्मचाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. पाणी येत नसल्याने जनता नगरसेवकांच्या घरी येत आहे. मात्र याचे गांभीर्य एलअँडटी आणि केयुआयडीएफसीला नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी बैठक सुरू होण्यापूर्वीच कौन्सिल सेक्रेटरींनी शहरातील पाण्याच्या समस्येबाबत बैठक बोलाविण्यात आली आहे.
त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांना तातडीने बोलावून घेण्याची सूचना केली. तरीदेखील वेगवेगळी कारणे सांगून कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगरसेवक रवी धोत्रे म्हणाले, शहरात पाण्याची समस्या गंभीर असतानाच टँकरसाठी फोन करून देखील वेळेत टँकर मिळत नाही. त्यामुळे ही मिटींग रद्द करून बैठकीची पुढील तारीख ठरविण्यात यावी, असे सांगितले. यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, ज्वलंत पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत अधिकारी उपस्थित नाहीत ही गंभीर बाब आहे. शहरात 15 दिवसातून एकदा पाणी येत आहे.
एलअँडटीचे काम कुठपर्यंत पोहोचले, याबाबत सभागृहाला माहिती देणे गरजेचे आहे. मात्र एलअँडटी आणि केयुआयडीएफसी अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने याबाबत आपण संबंधितांच्या मुख्य कार्यालयाला पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. नगरसेवकांच्या मागणीनुसार आजची बैठक रद्द करून 3 एप्रिलला सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात येईल. त्यावेळी आवश्यक सर्व माहिती घेऊनच बैठकीला उपस्थित रहावे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयातून शहराकडे आणण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे, याबाबत माहिती देण्यासाठी ड्रोनद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. सदर चित्रीकरण सभागृहात प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात येईल.
अधिकाऱ्यांपासून ते व्हॉल्व्हमॅनपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुढच्या बैठकीला उपस्थित राहणे जरुरीचे आहे असे स्पष्ट केले. नगरसेवक अॅड. हनमंत कोंगारी म्हणाले, महापौरांनी बैठक बोलाविली असताना एलअँडटी आणि केयुआयडीएफसीच्या उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात यावे. त्यानंतर कंपनीला काळ्या यादीत घालण्याचा विचार व्हावा. कर्मचाऱ्यांना कोंडल्यानंतर कोणते अधिकारी सोडवायला येतात, पाहू. पाणी समस्येची अधिकाऱ्यांना काळजी नाही, असे म्हणाले. नगरसेवक रवी धोत्रे म्हणाले, सभागृहात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सभागृहाचे गांभीर्य नाही, कॉमेडी करण्याचे हे ठिकाण नसून जे अधिकारी गैरहजर आहेत त्यांना नोटीस देऊन कारवाई करावी. पाणी येत नाही यासाठी प्रभागातील रहिवासी नगरसेवकांच्या घरी येत आहेत, त्याला कोणी तोंड द्यावे, असा प्रश्न केला. उपस्थित सर्व नगरसेवकांनी एलअँडटी आणि केयुआयडीएफसीच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पुढील बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. उपस्थित होत्या.
वेळेचे गांभीर्य हरवले…
शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यासाठी महापौर मंगेश पवार यांनी गुरुवारी दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार कौन्सिल विभागाकडून सभागृहात बैठकीची तयारी करण्यात आली. मात्र दुपारचे 1 वाजले तरी सभागृहात अधिकारी व नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत. उपमहापौर वाणी जोशी हजर झाल्यानंतर 1 वाजून 10 मिनिटांनी बैठकीला सुरुवात झाली. सदर बैठकीचे आयोजन करणारे महापौर मंगेश पवार देखील स्वत: गैरहजर राहिले. त्यामुळे बैठकीचे आणि वेळेचे गांभीर्य सर्वांनीच पाळले नसल्याचे यावेळी दिसून आले.









