माजी मंत्री मिकी पाशेको यांनी केले शरसंधान : भारतीयत्व, आमदारकी, पासपोर्ट रद्दतेची मागणी
पणजी : विद्यमान सरकारात हल्लीच मंत्रीपदी वर्णी लागलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा जन्म पोर्तुगालमध्ये नोंदणीकृत असल्याचे कागदोपत्री पुरावे प्राप्त झाले असून त्यावरून ते मंत्रीच नव्हे तर आमदार म्हणुनही अपात्र ठरत आहेत. त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा. त्यासाठी पारपत्र कार्यालयास 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे, अन्यथा प्रसंगी आपण सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जाणार असल्याचा इशारा पाशेको यांनी दिला आहे. मिकींच्या या चालीमुळे पर्यावरणमंत्री सिक्वेरा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत पाशेको यांनी सिक्वेरा यांच्या विदेशी नागरिकत्वाची पोलखोल केली.
भारतीय नागरिकत्व रद्द करावे
पारपत्र कार्यालयास लिहिलेल्या पत्रात मिकी यांनी म्हटले आहे की, सिक्वेरा यांचा जन्म 16 एप्रिल 1957 रोजी मोम्बासा केनया या देशात झाला होता. त्यानंतर 27 मार्च 2001 रोजी त्यांनी लिस्बन पोर्तुगाल येथील सेंट्रल रजिस्ट्री ऑफ बर्थस्मध्ये जन्मनोंदणी केली, यासंबंधी पुरावे जोडले आहेत. या पुराव्यांच्या आधारे त्यांचे भारतीय नागरिकत्व त्वरित रद्द करण्यात यावे, असे म्हटले आहे.
सिक्वेरांचा पासपोर्ट रद्द करण्यास 15 दिवसांची मुदत
लिस्बन, पोर्तुगाल येथील सेंट्रल रजिस्ट्री ऑफ बर्थस्मध्ये जन्मनोंदणी असलेल्या गोमंतकीयांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया गोवा पारपत्र कार्यालयाने सुरू केली आहे. जे सर्वसामान्य लोक केवळ स्वत:च्या मुलांना युरोपमध्ये चांगली नोकरी मिळावी या हेतूने पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी करतात त्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात येतात. पारपत्र कार्यालयाने तोच नियम आता मंत्री सिक्वेरा यांनाही लावावा व त्यांचा पासपोर्ट 15 दिवसांच्या आत रद्द करण्यात यावा, अशी मागणी पाशेको यांनी केली आहे.
उच्चपदस्थांचे पासपोर्ट रद्द करावे
अशाप्रकारे पासपोर्ट रद्द करणे योग्य आहे की नाही याची आपणास खात्री नाही. तरीही पारपत्र कार्यालयाने प्रथम गोवा सरकार आणि प्रशासनातील उच्च पदांवर असलेल्या लोकांचे पासपोर्ट रद्द केले पाहिजेत, असेही पाशेको यांनी म्हटले आहे.
सिक्वेरा आमदार म्हणूनही अपात्र
अशाप्रकारे स्वत: एक विदेशी नागरिक असतानाही सिक्वेरा यांनी भारतात निवडणूक लढविणे हे कायद्याचे एक अतिशय गंभीर उल्लंघन आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोगालाही प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली असल्याचे सिद्ध होत असून ते आमदार म्हणुनही अपात्र ठरत असल्याचे पाशेको यांनी म्हटले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पारपत्र कार्यालय निष्पक्षपणे निर्णय घेऊन सिक्वेरा यांचा पासपोर्ट रद्द करेल, असा विश्वास पाशेको यांनी व्यक्त केला आहे.









