वार्ताहर/नंदगड
कक्केरीपासून करीकट्टी गावाला जाणाऱ्या रस्त्यावर डौगी नाला आहे. या नालावरील पुलावरील पाणी आल्याने गेले दोन दिवस सकाळच्या वेळेत काही तास सकाळपासून कक्केरी-करीकट्टी गावचा संपर्क तुटतो. दुपारनंतर पाणी ओसरल्याने पुन्हा वाहतूक सुरळीत होते. कक्केरी ग्रामपंचायत हद्दीतून हा नाला वाहतो. गुरुवारी सकाळी नाला भरून वाहत असल्याने व पुलावर पावसाचे पाणी आल्याची माहिती कक्केरी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी व तलाठी यांना समजताच त्यांनी या पुलाजवळ जाऊन कचरा घेऊन जाणारे ग्राम पंचायतीचे वाहन आडवे लावून पाणी आलेल्या पुलावरील रस्त्यावरून जाऊ नये, अशी विनंती जनतेला केली. व आपल्या कर्मचाऱ्यांना या रस्त्यावरून जाणाऱ्या जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यासाठी ठेवले होते.
दुपारनंतर पाणी कमी झाल्याने पुन्हा रस्ता सुरळीत झाला होता. शुक्रवारी सकाळच्या वेळेत पुन्हा काही प्रमाणात पुलावर पाणी आले होते. परंतु काही वेळातच पाणी ओसरले होते. करीकट्टी गावातील मुले कक्केरी येथे शाळेला येतात. नाल्यावरील पुलावर पाणी आल्याचे पाहताच धोका ओळखून ही मुले पुन्हा आपल्या करीकट्टी गावी गेली. गेल्या काही दिवसापासून कक्केरी भागात संततधार पाऊस पडत आहे. त्यातच रामापूर, गस्टोळी, भुरूणकी, मास्केनट्टी हद्दीतील शेतवडी व तलावे भरून वाहत असल्याने त्यांचे पाणी डौगी नाल्यात येत आहे. त्यामुळे नाला दुथडी वरून वाहत आहे. या नाल्यावर पाणी आल्याने कक्केरी भागातील नागरिकांनी व महिलांनी गंगापूजन केले.









