जटायूचा मोठा भाऊ संपाती याने रावण सीतेला आकाशमार्गाने दक्षिणेकडे श्रीलंका येथे घेऊन गेला ही वार्ता दिली. त्यानंतर वानरांसहित सर्वजण महासागराच्या तिरावर पोहोचले. तेव्हा त्या अथांग महासागराला पार करून लंकेत जाणे अशक्य आहे असे वाटून ते हताश झाले. त्यावेळी अंगद वानरांना धीर देत म्हणाला “निराशा व्यर्थ आहे, त्याने कोणतीही कृती पूर्णत्वास जात नाही. निराशा ही अपयशाचे मूळ आहे. ती विषारी शापाइतकीच भयानक आहे.” त्यानंतर मैंद, द्विविदा, सुषेणा, जांबवान आणि अंगद यांनी आपापली क्षमता सांगितली. त्यानंतर जांबवान हनुमंताकडे पाहून म्हणाले “हे हनुमान, तू तर भगवान विष्णूचे वाहन असणाऱ्या गरूडाच्या तोडीस तोड आहेस.” त्यानंतर जांबवान सर्वाना म्हणाला “आपली विशेष मोहीम पार पडण्याची क्षमता एकट्या हनुमंताकडे आहे असे मी समजतो”. लहानपणी मिळालेल्या वरदानानुसार कोणी आठवण करून दिल्यास हनुमंताला आपल्या शक्तीची जाणीव होईल आणि ही आठवण जांबवानने करून दिली.
त्यानंतर हनुमंताने महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी जाऊन प्रथम सूर्य, इंद्र, वायू आणि ब्रह्मदेवाना अभिवादन केले. त्यानंतर पर्वतावर चढून भगवान रामचंद्रांच्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणाप्रमाणे ‘जय श्रीराम’ उच्च्स्वरात घोषणा करत लंकेच्या दिशेने आकाशात झेप घेतली. शक्य आणि अशक्य याची हनुमंताला चिंता नव्हती, आपल्या क्षमतेप्रमाणे प्रभू रामचंद्रांची प्रेमाने सेवा करण्याची त्याची इच्छा होती, म्हणून तो निर्भय होता. जेव्हा आपण भौतिक दृष्टीने कोणत्याही कार्याकडे पाहतो तेव्हा आपल्या मनात अपयशाची भीती, मृत्यूची भीती, अपेक्षाभंगाची भीती निर्माण होते. पण हनुमंतासाठी फक्त एकच विचार होता, प्रामाणिकपणे प्रयत्न करून प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करण्याचा. प्रामाणिकपणे कोणतीही गोष्ट करत असताना अडथळे तर येणारच, तसे हनुमंत उ•ाण करत असताना त्यालाही अडचणींना सामोरे जावे लागले, पण त्याचे लक्ष ध्येयावर होते म्हणून तो सर्व अडथळे दूर करू शकला.
सर्वप्रथम अडथळा आला तो मैनाका पर्वत. मैनाका पर्वत हनुमंतासमोर आला आणि हनुमंताला म्हणाला, माझी इच्छा आहे की तुला फार लांबचा पल्ला गाठायचा आहे तेव्हा तू इथे काही काळ विश्र्रांती घे. काही वेळा आपल्या हितचिंतकांच्या रूपात असा सल्ला देण्यात येतो, पण त्यातून आळस व अज्ञान निर्माण होऊन ध्येयाचा विसर पडतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. (भ गी 3.30) मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर: ।। अर्थात ‘माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर.’ याची जाणीव ठेवून हनुमंताने विचार केला की आपण इथे थांबलो तर आळसाला निमंत्रण दिल्यासारखे आहे आणि आपले ध्येय गाठायलाही उशीर होईल. त्यासाठी हनुमंताने पर्वताला त्याच्या विनंतीचा मान म्हणून केवळ स्पर्श केला आणि आपले उड्डाण चालू ठेवले.
त्यानंतर काही वेळाने आणखी एक सुरासा नावाची राक्षिसी हनुमंतासमोर देवतांच्या इच्छेनुसार त्याची परीक्षा घेण्यासाठी आली. एका प्रचंड कुरूप व पर्वतप्राय राक्षसीचे रूप घेऊन सुरसा महासागरातून वर आली आणि हनुमंताचा रस्ता अडवत म्हणू लागली ‘मला ब्रह्मदेवाचे वरदान आहे की माझ्यासमोर कोणत्याही प्रकारचे अन्न आले तरी ते मी खाऊ शकेन. हे वानरश्रेष्ठा आता तू माझ्यासमोर आलेला
आहेस.
आता माझ्या विशाल मुखात प्रवेश करण्यासाठी मी तुला आमंत्रित करीत आहे. हनुमान उत्तरला, ‘भगवान प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तू मला मदत केली पाहिजेस’ परंतु सुरसाने आपले मुख 10 योजने विस्तारले, हनुमंताकडेही सिद्धी प्राप्त असल्याने त्यानेही आपल्या शरीराचा 20 योजने विस्तार केला. दोघेही एकमेकांपेक्षा आपला आकार वाढवू लागले. त्याक्षणी चतुर हनुमंत पापणी लवण्याच्या आत अंगठ्याएवढा संकुचित झाला आणि वेगाने सुरसाच्या मुखात जाऊन परत बाहेर आला आणि सुरसाला म्हणाला, ‘तुझी अट आता पूर्ण झाली आहे मला पुढील प्रवासास जाऊ दे.’ हनुमंताच्या चतुरतेने सुरसा आनंदित झाली आणि आपल्या मूळ स्वरूपात येऊन म्हणाली, ‘धन्य आहे! हे वानरश्रेष्ठा, जा आणि तुझे कार्य पूर्ण कर, लवकरच तुझ्यामुळे भगवान राम आणि सीतेची पुनर्भेट होवो’. सुरसा ही ‘अहंकार’ या अडथळ्यांचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा आपल्याला अहंकार होतो, तेव्हा आपण वस्तुस्थिती विसरून स्वत:लाच मोठे समजू लागतो, आपल्यापेक्षा कर्तृत्वाने कोणी मोठे झालेले आपल्याला पाहवत नाही. ज्याप्रमाणे सुरसा हनुमंतापेक्षा आपला आकार वाढवू लागली आणि हनुमंताच्या सेवेमध्ये अडथळा आणू लागली. पण भगवंताच्या सेवेसाठी हनुमंताने नम्र भाव स्वीकारून चतुरतेने अंगठ्याएवढा आकार धारण केला आणि आपली सुटका करून घेतली. जेव्हा आपण भगवंताच्या सेवेत नम्रभाव स्वीकारतो तेव्हा भगवंताच्या कृपेने अहंकाराचा पर्वत आपण ओलांडून जाऊ शकतो.
उंच आकाशातून पुढे जात असताना अचानक सिंहिका नावाच्या राक्षसीने हनुमंताची सावली पकडली. अचानक काय घडले याची कल्पना नसल्याने हनुमंताला आपली शक्ती क्षीण झाल्याचे जाणवले, त्याने भोवताली पाहिल्यावर लक्षात आले की एक प्रचंड व भयंकर राक्षसी समुद्रातून वर येत आहे. आपले विशाल मुख उघडून सिंहिका चाल करून येत आहे हे चाणाक्ष हनुमंताच्या लक्षात आले. सिंहिकाने हनुमंताला गिळंकृत करण्यासाठी आपले मुख विस्तारले होते पण अगदी लहानसा आकार धारण करून तो तिच्या भयानक शरीरात खोल शिरला आणि आपल्या अणुकुचीदार नखांनी त्याने तिच्या हृदयाचे तुकडे तुकडे केले, आणि तिच्या शरीरातून हनुमंत बाहेर आले. सिंहिकेचे मृत शरीर पाण्यात पडल्यावर सर्वजण हनुमंताच्या या पराक्रमाची स्तुती करू लागले. सिंहिका ही मत्सर या अडथळ्यांचे उदाहरण आहे.
ज्याप्रमाणे हनुमंताच्या सावलीला पकडण्याचे म्हणजे प्रतिमेचा अंधकार पाहण्याचे, त्याप्रमाणे मत्सरी लोक दुसऱ्यांच्या नकारात्मक गुणांकडे जास्त लक्ष देतात आणि सकारात्मक गुणांकडे पहातही नाहीत. आपण जेव्हा दुसऱ्यामध्ये कोणताही दोष पाहतो तेव्हा तो दोष आपल्यामध्येही आहे हे विसरून जातो. म्हणून व्यक्तीने विशेषत: हरिभक्ताने इतरांमध्ये चांगले गुण पहावयास शिकले पाहिजे. महात्मा हा कधीही दुसऱ्यांमधील दोष मत्सराने पहात नाही तर त्या व्यक्तीला त्या दोषातून बाहेर काढण्यासाठी त्याकडे पाहतो. ज्याप्रमाणे एखादा वैद्य आपल्या रोग्यांकडे पाहतो तो त्यांचा रोग दूर करण्याला मदत करण्यासाठी, मत्सराने त्याला त्या रोगाबद्दल हिणवण्यासाठी नव्हे. हनुमंत आपल्याला मत्सर या रोगातून कसे बाहेर यावे हे शिकवितात. आपल्या हृदयातील मत्सर हा मुळापासून नष्ट केला पाहिजे आणि ते केवळ हरिनामाचा जप केल्यानेच शक्मय आहे.
शेवटी हनुमंत लंकेच्या महाद्वाराकडे आला. लंकिनी नावाच्या राक्षसीने त्याला आत प्रवेश करण्यापासून अडविले आणि तिने हनुमंताला गालावर थप्पड मारली, प्रत्युत्तर म्हणून हनुमंतानेही तिला थप्पड मारली, तक्षणी ती जमिनीवर मृत होऊन पडली. त्यानंतर अनेक राक्षस पाप कर्मामध्ये गुंतल्याचे हनुमंताने पाहिले, सुंदर निर्वस्त्र स्त्रियांही पहिल्या, अनेक इंद्रियतृप्तीची प्रलोभने पाहिली पण हनुमंत आपल्या ध्येयाने प्रेरित असल्याने त्याचे चित्त विचलित झाले नाही. अंतिमत: अशोकवनात सीतेची भेट झाली आणि अंगठीसहित प्रभू श्रीरामचंद्रांचा संदेश दिला. हीच हनुमंताची आपल्यासाठी सर्वोच्च शिकवण आहे. या भौतिक जगातील सर्व काही भगवान श्रीरामाच्या प्रसन्नतेसाठी आहे पण स्वत:च्या इंद्रियतृप्तीसाठी रावणासारख्या असुरी वृत्तीच्या व्यक्तींनी त्यावर कब्जा केला आहे. हरिभक्त हा हनुमंतासारखे सीतेला परत श्रीरामांकडे घेऊन जाण्याची सेवा करतात.
संत तुकाराम एका अभंगात ह्या हनुमंताच्या भक्तीचा आदर्श गौरव करताना म्हणतात. शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ।।1।। काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ।।2।। शूर आणि धीर । स्वामीकाजी तूं सादर ।।3।।
म्हणे ऊद्रा । अंजनीचिया कुमारा ।। अर्थात अहो रामदूत हनुमंता मी तुम्हाला
शरण आलो आहे. हे श्रेष्ठ वीरा, मला रामभक्तीची वाट दाखवा. तुम्ही धैर्यवान आणि शूर आहात आणि स्वामींच्या सेवेत तत्पर आहात. तुकाराम महाराज म्हणतात, अंजनीमातेच्या सुपुत्रा आपण प्रत्यक्ष शिवाचेच रूप आहात.
-वृंदावनदास








