आधार लिंक नाही, लाभार्थ्यांसमोर समस्या
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत तांदळाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ही योजना सोमवारपासून लागू केली जाणार आहे. मात्र, लाभार्थ्यांकडे बँक खाते नाही. तसेच आधारकार्डला बँक खाते लिंक नाही आणि इतर समस्या असल्याने लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय या योजनेविषयी अद्याप लाभार्थ्यांमध्ये जागृती नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सरकार आम्हाला तांदळाऐवजी पैसे कसे देणार? असा प्रश्नदेखील लाभार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे अन्नभाग्य योजनेतील तांदळाचे पैसे कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे सोमवारपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे कसे जमा होणार, हे पहावे लागणार आहे. सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. त्यापाठोपाठ आता अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख रक्कम दिली जाणार आहे. सरकारकडे मुबलक धान्यसाठा उपलब्ध नसल्याने धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबातील प्रमुख सदस्याच्या खात्यावर प्रतिकिलो 34 रुपयांप्रमाणे रक्कम जमा होणार आहे. मात्र, काही लाभार्थ्यांची बँक खाती आधारकार्डला लिंक नाहीत. तर काही लाभार्थ्यांची बँक खाती बंद आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रथमत: बँक खाते सुरळीत करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
जिल्ह्यात अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डधारकांची संख्या मोठी आहे. या सर्व लाभार्थ्यांना तांदळाऐवजी रोख रक्कम दिली जाणार आहे. मात्र, बँक खाते आणि आधार लिंकची समस्या असल्याने अडचणी निर्माण होणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन दुकानदारांना जागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप लाभार्थ्यांपर्यंत जागृती झालेली नाही. त्यामुळे या योजनेच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे 170 रुपये जमा होणार आहेत. त्याबरोबर माणसी 5 किलो धान्यदेखील वाटप केले जाणार आहे. जुलै महिन्यात एका कुटुंबाला धान्याबरोबर रोख रक्कमदेखील मिळणार आहे. मात्र, पुढील महिन्यात रोख रक्कम देणार की पूर्ण 10 किलो तांदूळ वितरित करणार, याबाबत संभ्रम आहे.









