दिल्लीच्या 7 जागा लढविण्याची काँग्रेसची तयारी : ‘आप’ने दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजविरोधात एकत्र आलेल्या 20 हून अधिक राजकीय पक्षांच्या आघाडीत आताच तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व 7 जागांवर उमेदवार उतरविण्याची तयारी चालविली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने काँग्रेसने दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असेल तर विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा अर्थच नसल्याचे म्हटले आहे.
मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या आगामी बैठकीत सामील होण्याचा किंवा न होण्याचा निर्णय निर्णय पक्षनेतृत्व घेणार असल्याचे आप’कडून ‘सांगण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली असून यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारींवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत खर्गे आणि राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांदरम्यान एकजुटतेची गरज असल्याची भूमिका मांडली आहे.
आम आदमी पक्षासोबतच्या संभाव्य आघाडीला माजी खासदार संदीप दीक्षित, अजय माकन यांच्यासह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. परंतु पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय सर्वांना स्वीकारार्ह असल्याचे बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्ली सेवा विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेसने काही दिवसांपूर्वी संसदेत आम आदमी पक्षाला समर्थन दिले होते. तर संदीप दीक्षित आणि अजय माकन यासारख्या नेत्यांनी या मुद्द्यावर वेगळी भूमिका मांडली होती.
बुधवारच्या बैठकीत पक्षाचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल, पक्षाचे दिल्ली प्रभारी दीपक बाबरिया, प्रदेशाध्यक्ष चौधरी अनिल कुमार, वरिष्ठ नेते अजय माकन, जयप्रकाश अग्रवाल आणि अन्य उपस्थित होते.
सर्व मतदारसंघांमध्ये कामाला लागा
लोकसभा निवडणुकीला आता केवळ 7 महिने शिल्लक राहिले आहेत. अशा स्थितीत दिल्लीत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना 7 ही मतदारसंघांसाठी तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही किती जागांवर निवडणूक लढविणार हे नंतर निश्चित केले जाणार आहे, परंतु आम्हाला दिल्लीच्या सर्व 7 जागांवर पूर्ण शक्तिनिशी तयारी करण्याचे निर्देश मिळाल्याची माहिती काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिली आहे.









