ऑनलाईन टीम/तरुण भारत
कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजबावर बंदी (Hijab Ban) घातली आहे. यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) द्विसदस्यीय खंडपीठाने वेगवेगळे निकाल दिलेत.
हिजाबबंदीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात येणार होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींमध्ये याबाबत मतभिन्नता दिसल्याने हे प्रकरण आता त्रिसदस्यीय पीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारचा निर्णय वैध ठरवला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या प्रकरणी २६ याचिका दाखल झाल्या. त्याच्या एकत्रित सुनावणीनंतर एका न्यायमूर्तींनी कर्नाटक सरकारचा हिजाब बंदीचा निर्णय रद्द ठरवला, तर दुसऱ्या न्यायमूर्तींनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. खंडपीठातील दोन्ही न्यायमूर्तींनी या याचिकेवर वेगवेगळे निकाल दिल्याने आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत सरन्यायाधीश यू. यू. लळित हे निर्णय घेतील.
हे ही वाचा : तेल कंपन्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ; २२ हजार कोटींचं अनुदान देण्याचा निर्णय
दरम्यान, कर्नाटकच्या उडुपी येथील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेजमध्ये ६ मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. त्यावरून हा वाद सुरू झाला होता. शैक्षणिक संस्थांमध्ये गणवेश निश्चित करणे हे योग्य असून ज्यावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती जे. एम. खाजी यांच्या त्रिसदस्यीय पीठाने हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळल्या होत्या.
दरम्यान, सर्वोच्च न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय योग्य ठरवला आणि या बंदीविरोधातील याचिका फेटाळून लावल्या. तर, दुसरे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी उच्च न्यायालायाचा निर्णय अयोग्य ठरवत, त्याच्या समर्थनार्थ केलेल्या याचिका फेटाळल्या. त्यामुळे आता हे प्रकरण सरन्यायाधीशांमार्फत त्रिसदस्यीय पीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.