प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ : दळणवळणाचा खर्च वाढणार
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली. यामुळे बुधवारी बेळगावमधील डिझेलच्या दराने नव्वदीचा आकडा पार केला. महागाईने होरपळलेल्या नागरिकांना आता डिझेल दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. डिझेल दरवाढीमुळे वाहतुकीचे दर देखील वाढण्याची शक्यता असल्याने यामध्ये सर्वसामान्य भरडले जाणार आहेत. दूध, वीज, शैक्षणिक फी सोबतच आता राज्य सरकारने डिझेलच्या दरात वाढ केली. मंगळवारी मध्यरात्रीपासून डिझेलचे नवे दर लागू करण्यात आले. यापूर्वी बेळगावमध्ये 88.99 रुपये प्रति लिटर दराने डिझेलची विक्री होत होती. आता ती 90.89 रुपये दराने विक्री होत आहे. दरवाढ होणार असल्याचे समजताच बऱ्याच कमर्शियल वाहनांच्या टाक्या फुल करण्यात आल्या. यामुळे मंगळवारी रात्री पेट्रोल पंपांवर गर्दी दिसून आली.
वाहतुकीच्या दरात वाढ होण्याची शक्यता
कमर्शियल तसेच प्रवासी वाहनेही डिझेलवर अवलंबून असल्याने डिझेलचे दर वाढताच आता त्यांचेही दर वाढण्याची शक्यता आहे. दळणवळणाचा खर्च वाढल्यास त्याचा परिणाम ग्राहकांना बसणार आहे. प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ झाल्याने डिझेलचा खर्चही अनेक पटीने वाढणार आहे. त्यामुळे काही दिवसात वाहतुकीचे दर वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेळगाव जिल्ह्याला लागूनच महाराष्ट्र राज्याच्या सीमा आहेत. यापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकातील डिझेलच्या दरात 3 ते 3.50 रुपयांचा फरक असल्यामुळे लांब पल्ल्याचे सर्व ट्रक, ट्रॅव्हल्स, कंटेनर व इतर कमर्शियल वाहने डिझेल भरण्यासाठी बेळगावमध्ये येत होती. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांचा मोठा व्यवसाय होत होता. परंतु वाढलेल्या दरांमुळे आता ही तफावत 1 रुपयांवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे व्यवसाय कमी होण्याची चिंता सीमाभागातील पेट्रोल पंप चालकांना लागली आहे.
शहर डिझेलचा दर
- बेळगाव……………90.89
- कागल……………..91.09
- गडहिंग्लज………..91.99
- चंदगड……………..92
पेट्रोलपंप चालकांना फटका बसण्याची शक्यता
कर्नाटकातील डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली. याचा काही फटका बेळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना बसण्याची शक्यता आहे.
– प्रशांत मेलगे (सदस्य पेट्रोल डिलर्स असोसिएशन)









