वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये डिझेलच्या मागणीमध्ये 2.9 टक्के इतकी घसरण दिसून आली आहे तर या तुलनेमध्ये पेट्रोलच्या वापरामध्ये 0.4 टक्के इतकी वाढ मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये नोंदवली गेली असल्याची माहिती तेल कंपन्यांकडून दिली गेली आहे.
दुसरीकडे विमान प्रवासासाठी लागणाऱ्या इंधनाच्या मागणीत (एटीएफ) 9.5 टक्के इतकी ऑगस्टमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. एलपीजीच्या मागणीतही 4.4 टक्के वाढ दर्शवली गेली आहे. ऑगस्ट 2019 च्या तुलनेमध्ये पाहता यंदा एटीएफच्या विक्रीमध्ये 3.2 टक्के इतकी घसरणच दिसून आली आहे. पण पेट्रोल आणि डिझेल यांच्या विक्रीत मात्र अनुक्रमे 21.2, 8.4 टक्के वाढ दिसून आली आहे.
खासगी इंधन रिटेल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे तेल कंपन्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये दबाव दिसून आला. खासगी कंपन्यांनीही बाजारातील आपला वाटा जास्तीतजास्त उचलण्याची धडपड चालवली आहे. महिन्याच्या स्तरावर पाहता पेट्रोलची विक्री 3.4 टक्के वाढली आहे तर डिझेलची विक्री मात्र 3.7 टक्के घसरली आहे. माल वाहतुकीसह खाण आणि शेतीसाठी डिझेलचा वापर देशामध्ये 40 टक्के इतका होताना दिसतो.
जेट इंधनाच्या किमती 14 टक्के वाढल्या
विमानांसाठी लागणाऱ्या एटीएफ इंधनांच्या किमतीमध्ये तिसऱ्यांदा 14 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एटीएफची किमत 13,911 रुपये प्रति किलो लिटरने वाढली असून तेथे हे इंधन 1 लाख 12 हजार 419 रुपये प्रति किलो लिटर प्रमाणे उपलब्ध आहे.