कोल्हापूर :
दरवर्षी महापालिका पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते. याशिवाय मुदतीत रस्ते खराब झाल्याने ठेकेदाराकडूनही डागडूजी केली जाते. पावसात रस्ते वाहून गेले आहेत. मागील दोन महिन्यात केलेल्या रस्त्यांवर आज डर्टट्रॅक आणि खड्ड्यांची मालिका झाली आहे. यंत्रणेच्या टक्केवारीमुळे शहरवासीयांचे कंबरडे मोडत आहे. संबंधितांनी डांबरही खाल्ले कि काय? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
शहरातील सुमारे 750 किलोमीटरपैकी 100 रस्ते वाहतुकीस योग्य असल्याचे तज्ञ सांगतात. महाद्वार, अंबाबाई मंदिर परिसर, शाहूपूरी, आरटीओ कार्यालय, भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीपूरी, दसरा चौक ,राजारामपूरी, कसबा बावडा आदी मुख्य शहरातील भागासह मध्यवस्तीतील रस्त्यांची वाताहात झाली आहे. अगदी सहा महिन्यात केलेले रस्तेही पावसात खराब झाले आहेत. रस्त्यातील खडी वर आली आहे. खासबाग, बिंदू चौक, सासने मैदान, बसंत बहार रोड रस्त्यावर पाण्याप्रमाणे लाटा उमटल्या असून काही ठिकाणी उभ्या भेगा पडल्या आहे. नवीन रस्ते बांधणी निकृष्ट दर्जाची झाली तसेच उन्हाळ्यातील दुरुस्ती वरवर केल्याने पावसाळ्यात हे रस्ते डर्टट्रॅक बनले आहेत.
जीवमुठीत घेऊनच या रस्त्यांवरुन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी दोन ते पाच फुटांपर्यंत खड्डे परसले आहेत. सासने मैदान, लाईन बझार, राजारामपुरी या ठिकाणी सलगपणे खड्ड्यांची मालिकाच असल्याने वाहनधारक मेटाकुटीला येत आहेत. खड्ड्यातील रस्त्यावरुन प्रवास म्हणजे वाहनांसह शरीराचेही नुकसान होत आहे. विशेष करून पाठीचे व मणक्याचे आजार वाढले आहेत. ठेकेदार, अधिकारी आणि निधी आणणारी यंत्रणा यांच्यातील मिलीभगतमुळे दर्जा घसरत आहे. मात्र महापालिकेचा गलथान कारभारच शहरवासीयांच्या जीवावर आला आहे. रस्त्यांसाठी आणलेल्या निधीतून पहिल्याच टप्प्यात सरासरी 15 ते 20 टक्क्यांची वरुन खालपर्यंची वाटणी काढून घेतली जाते. ही वाटणी करुन देण्यात महापालिकेचे अधिकारीच मध्यस्थी करतात. रस्ते कामातील मलिदा अगोदरच मिळत असल्याने कामाची सुरूवात होण्यापासून ते काम खराब झाले तरी यंत्रणा कानाडोळा करत असल्याचे वास्तव आहे.
- माती मिश्रित मुरुमामुळे दर्जा घसरला
सन 2017 ला वॉलचंद कॉलेजने रस्त्यांची तपासणी करुन अहवाल दिला होता. तसा यंदाही अशाच प्रकारे रस्त्यांची तपासणी करुन रस्ते बांधणी अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पेव्हर व हॉटमिक्स पध्दतीने केलेल्या रस्त्यासाठी एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत डागडूजी करण्याची जबादारी ठेकेदाराची असते. मुदत आहे तोपर्यंतच रस्ते कसेबसे तग धरत होते. किंवा मुदतीत खराब झाल्यास मलमपट्टी केली जाते. मे महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांचे सर्वेक्षण करुन डांबर-खडीचे योग्य मिश्रन घालून रोलींग करुन रस्त्यांची डागडूजी केली जात नाही. पावसाळा सुरु झाल्यानंतर माती मिश्रीत मुरूम टाकून पॅचवर्क केले जात असल्यानेच रस्ते खड्ड्यात जात आहेत.
- निविदेतील शर्थीप्रमाणे रस्ते व्हावेत
सध्या खराब रस्ते ठेकेदारांकडून दुरूस्त करतानाही मापात माप केल्याची उदाहरणे आहेत. डांबरी रस्त्यातील खड्डे मुरूमाने बुजविले जातात. रोलींग केले जात नाही. यानंतर पडलेल्या पावसाने डांबरी रस्ते डर्टट्रॅक बनत आहेत. पाऊस उघडताच धुळीने माखत आहेत. रस्ते बांधणी करतानाच ते नियमानुसार निवीदेप्रक्रियेतील अटी शर्थीप्रमाणे व्हावेत, याची शहानिशा केल्यास रस्ते खड्ड्यात जाण्याचे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे.








