विक्रेत्यांवर माल झाकून ठेवण्याची वेळ : सुकी मासळीविक्रेत्यांची गोची : ग्राहकांचीही झाली गैरसोय
डिचोली ; गेले अनेक दिवस सुरू असलेला पावसाची काल सकाळपासून संततधार सुरूच होती. याचा डिचोलीच्या आठवडा बाजारावर मोठा परिणाम झाला. सकाळी बाजारात विक्रेत्यांनी मांडलेला आपला माल दिवसभर झाकुनच ठेवावा लागला. सुकी मासळी विक्रेत्यांना तर आपला माल संध्याकाळपर्यंत उघडण्याची एकही संधी मिळाली नाही. पावसामुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांचीही सततच्या पावसामुळे कुचंबणा झाली. बुधवारी डिचोली आठवडा बाजारा दिवशी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरूच राहिल्याने कपडे, चप्पल व इतर सामान विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. मर्यादित पद्धतीने या विक्रेत्यांना आपला व्यवसाय करावा लागला. चप्पले व इतर सामान विक्रेत्यांना सामान उघडताच आले नाही. पाऊस काही प्रमाणात कमी झाल्यावर हे विक्रेते आपल्या मालाचे प्रदर्शन करीत होते. परंतु पावसाचा मारा सतत सुरूच राहिल्याने ग्राहकांची संख्याही रोडावली होती.
भाजी विक्रेत्यांनी भिजतच दुकाने लावली
भाजी विक्रेत्यांनी प्लास्टिकची अच्छादने घालून भाजी विक्री केली. तर गावठी भाजी व इतर सामान घेऊन बसणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांनी आपला माल भिजवतच बसणे पसंत केले. या संततधार पावसामुळे सुकी मासळी विक्रेत्यांचे मात्र बरेच हाल झाले. सकाळी बाजारात येऊन सुकी मासळीचा माल लावल्यावर जो प्लास्टिक अच्छादने घालून झाकून ठेवला होता. तो दिवसभर त्यांना उघडताच आला नाही. पाऊस सुरूच राहिल्याने या विक्रेत्यांनाही तसे ग्राहक मिळालेच नाही. त्यामुळे या विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. बाजारात सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र होते. त्यामुळे ग्राहकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. काही ठिकाणी तर चिखल मिश्रीत पाणी असल्याने लोकांची गैरसोय होत होती. भाजी बाजारात प्लास्टिक अच्छादने असल्याने लोकांना पावसापासून संरक्षण मिळत होते.









