आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते उद्घाटन : लाभ घेण्याचे आवाहन
खानापूर : तालुक्यातील डायलिसिस आवश्यक असलेल्या रुग्णांना आता अगदी अत्यल्प दरात डायलिसिस सेवा सरकारच्यावतीने उपलब्ध करण्यात आली असून, तालुक्यातील रुग्णांची आता येथे सोय होणार आहे. दोन डायलिसिस मशीन उपलब्ध असून, एकावेळी दोन रुग्णांची सोय होणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वीच ही सेवा कार्यान्वित होणे गरजेचे होते. मात्र आवश्यक असलेल्या इतर तांत्रिक अडचणी व सुविधा उपलब्ध नसल्याने या सेवेला थोडा विलंब झाला आहे. तालुक्यातील रुग्णांनी आता या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर येथील सरकारी रुग्णालयात डायलिसिस सेवेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
या सेवेचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते गुरुवारी येथील महिला बाल कल्याण रुग्णालयात करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेश किडसन्नावर यांनी उपस्थितांचे स्वागत करून डायलिसिस सेवा बीपीएल, एपीएल कार्ड धारकांना मोफत असल्याचे सांगितले. डायलिसिस फिजीशियन महेश कोने यांच्या निदर्शनाखाली डायलिसिस करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी डॉ. नारायण वड्डीन्नावर यासह इतर आरोग्य कर्मचारी तसेच संजय कुबल, गुंडू तोपिनकट्टी, राजू रायका, मल्लाप्पा मारिहाळ, बाबासाहेब देसाई, चांगाप्पा बाचोळकर, विठ्ठल करंबळकर, रवि पाटील, सुनिल मड्डीमणी, प्रकाश निलजकर आदी उपस्थित होते.









