बेळगाव : मधुमेहींची वाढती संख्या, वाढत चाललेले किडनी विकार पाहता डायलेसीस केंद्रांची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने रुग्णांची सोय आणि आरोग्य लक्षात घेऊन अरिहंत हॉस्पिटल ‘डायलेसीस सेंटर’ सुरू करणे काळाची गरज होती. हे डायलेसीस सेंटर डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या पुढाकाराने व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कार्य करेल व रुग्णांना येथे आरामदायी वातावरण मिळेल, असे मत प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट (किडनी विकार तज्ञ) यांनी व्यक्त केले. अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या डायलेसीस सेंटरचे उद्घाटन सोमवारी सकाळी डॉ. विद्याशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. एम. डी. दीक्षित व अरिहंतचे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. विजयकुमार पाटील उपस्थित होते.
डायलेसीस सेंटरचे वातावरण दहा वर्षांपूर्वी वेगळे होते. परंतु आता ही सेंटर्स रुग्णपेंद्री झाली असल्याने रुग्णांना तेथे सर्व सुविधा मिळतात. या सेंटर्समध्ये तज्ञ तंत्रज्ञ असून ‘डे केअर सेंटर’प्रमाणे ते रुग्णांची काळजी घेतात. अरिहंतचे डायलेसीस सेंटरसुद्धा याच पद्धतीने कार्यान्वित राहील, असे ते म्हणाले. डॉ. विजयकुमार म्हणाले, आज मशीन आहेत, परंतु सदैव उपलब्ध असणाऱ्या नेफ्रालॉजिस्टची संख्या कमी आहे. मात्र, अरिहंत येथे ही उणिव भासणार नाही. किडनी विकार वाढत असल्याने डायलेसीस सेंटरची गरजसुद्धा वाढत आहे.
प्रारंभी डॉ. एम. डी. दीक्षित यांनी स्वागत केले. प्रास्ताविक करताना ते म्हणाले, किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर परवडणाऱ्या खर्चामध्येच उपचार करण्यासाठी या अत्याधुनिक डायलेसिस सेंटरची सुरुवात केली आहे. किडनी रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तासन्तास त्यांना प्रतीक्षा करावी लागते, तसेच पैसाही खर्च होतो. याचा विचार करून येत्या काही दिवसात आम्ही डायलेसिससाठी स्मार्टकार्ड काढणार आहोत, जेणेकरून रुग्णांना ते रिचार्ज करता येईल व निरंतर लाभ घेता येईल. त्यांनीच डॉ. विद्याशंकर यांचा परिचय करून देऊन त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी डॉ. प्रभू हलकट्टी यांनीसुद्धा आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी डॉ. वरदराज गोकाक, डॉ. सूरज पाटील, डॉ. संजीव, डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. माधुरी दीक्षित, डॉ. अमृता जोशी, डॉ. अभिजीत हिरेमठ, डॉ. युवराज यड्रावी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. आरजू नुराणी यांनी केले.









