तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाचि वाद आपणासी
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..
सकाळी सकाळीच रेडिओवर तुकाराम बुवांचा हा अभंग लागला होता. स्वर हा स्वर्गीय होता अर्थात लता दीदींचा! तुकोबारायांच्या अभंगाची भाषा मोठी चित्तवेधक आहे. तशी सर्वच संत कवींची भाषा अशीच असते. त्यांचं ‘सहज बोलणे तरी उपदेश’ असतो. म्हणून तर शेकडो वर्षे झाली आजही ते अभंग संगीतकारांना, गायकांना, सतत हाका मारून बोलवत असतात. आव्हान देत असतात. कवितेची वाट गाण्यामुळे आणखीन सोपी होते हे खरं. त्याप्रमाणे हा तुकारामबुवांचा अभंग ऐकता ऐकता ‘तुका म्हणे होय मनाशी संवाद’ या वाक्यावर येऊन माझी गाडी अडकली. प्रवीण दवणे यांनी आपल्या लेखनात एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की उगाच नाही तुकाराम बुवा निघून गेले जर घरात किंवा माणसांच्या सहवासात जास्त राहिले असते तर या गोंधळात सुखी आणि एक तरी अभंग सुचू दिला असता की नाही कोण जाणे. सर्जनशील माणसाला स्वत:चा असा ‘मी टाईम’ हवा असतो. आणि त्याच्या आसपास वावरणाऱ्या बऱ्याचशा लोकांना ते कळत नाही. आवलीबाईंचे एक वेळ आपण समजू शकतो. पण नातेवाईक, सोयरेधायरे यांच्या बाबतीत तर आपण हातच जोडलेले असतात. संवाद करताना तुकाराम बुवांनी मनाशी संवाद असे म्हटले वस्तूत: नातेवाईक, सोयरे, मित्र मंडळ हे सर्वजण संवाद साधण्यासाठीच किंवा (न साधण्यासाठीही) उत्सुक असतात.
माणसाच्या मनाला संवादाची एवढी भूक असते की संवाद साधावा म्हणून वत्तृत्त्वाचे कार्यक्रम होतात. भाषणं होतात. हळदीकुंकवं होतात. मेळावे होतात. सभा, संमेलन, अगदी राजकीय आखाडे, मीडियावर रंगलेले वादविवाद आणि शेवटी संवादाचे रूपांतर वादात होऊन त्याचं कोर्टात झालेलं पर्यवसान इथपर्यंत हा संवाद चढत्या क्रमाने जातो. खरं तर समर्थांनी म्हटलं आहे, की ‘तुटे वाद संवाद तो हीतकारी’. पण याकडे लक्ष कोण देतो? संवाद साधणे ही अत्यंत महत्त्वाची कला आहे. खरंतर कलेच्या क्षेत्रातही वादी संवादी असे स्वर असतात. म्हणजेच रागामधला सर्वात महत्त्वाचा स्वर हा वादी असतो. आणि त्या खालोखाल महत्त्वाचा स्वर हा मात्र प्रतिवादी नसून तो संवादी स्वर असतो. कारण अगदी सरळ आहे वादी स्वराला पावलं टेकायला आधार तर हवा आणि तो आधारस्तंभ म्हणजे संवादीस्वर याचाच अर्थ असा की संवाद व्हायला हवा असेल तर एकापेक्षा अधिक व्यक्तींची किंवा संगीतामध्ये सुरांची उपस्थिती अत्यावश्यक असते. मग पुन्हा जाऊन आपल्याला प्रश्न पडतो की मग तुकोबा ‘मनाशी संवाद’ आणि ‘आपुलाचि वाद आपणाशी’ का म्हणत असतील. इथे दुसरा कोण असतो संवाद करायला? पुन्हा ते पुढे असे म्हणतात की ‘आपुलाचि वाद आपणाशी’ म्हणजे स्वत:शी संवाद करायचा आणि स्वत:शी वादही घालायचा! हे एकाच वेळेला कसं काय शक्य असेल त्यांना? पण संतांचं आपलं असंच असतं म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर का संवादातून वाद निर्माण होत असेल आणि तो संवादही स्वत:शीच असेल आणि वादही स्वत:शीच असेल, तर जुन्या शास्त्रकारांनी सतत उद्धृत केलेलं जे वचन आहे की ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ हे स्वत:शी वाद किंवा संवाद साधला तरी खरंच ठरतं की काय? थोडक्यात वाद असो किंवा संवाद वाद होण्यासाठी तरी आधी संवाद हा व्हावाच लागतो किंवा होणारा वाद हा सुद्धा एक प्रकारचा संवाद असतो, असं म्हणावं लागेल. ज्या संवादामध्ये परस्परांचे सूर जुळत नसतात किंवा मतं वेगळी असतात त्या संवादाला वाद असं म्हणायला हरकत नाही पण वाद वा वादविषयक असणारा संवाद जर होत राहिला तर तत्वबोध त्यातून होतो. याचाच अर्थ असा की दोन्ही बाजूंनी आपापला पूर्वपक्ष उत्तरपक्ष मांडला, की त्यातून त्यांना काय म्हणायचं आहे त्यामागचं मूळतत्व स्पष्ट होतं. आणि कोणाची बाजू बरोबर आहे, कोणाची बाजू अयोग्य आहे याचं ज्ञान आपोआपच होतं. हे चर्चेत आणि वादाने होतं. खरं तर चर्चेपेक्षा जास्त वादानेच होतं. कारण माणूस त्यामुळेच आपापले मुद्दे हिरीरीने मांडतो. त्याच्या पुष्ट्यार्थ पुरावे देतो. न्यायालयात आणखीन वेगळं काय चालतं? याच प्रकारचे लेखी आणि तोंडी संवाद तिथे सतत झडत असतात. थोडक्यात संवादाचं महत्त्व हे वादातीत असतं असं म्हणता येईल.
ले जा रे जा पथिकवा, इतना संदेसा पिया को
सुख चैन मोहे कछु ना सुहावे
ही चीज ज्या वीणाताई सहस्रबुद्धे यांच्या स्वरात आपण ऐकतो, त्या वेळेला संवादासाठी भुकेली असलेली विरहिणी आपल्या डोळ्यासमोर साक्षात उभी राहते. प्रेमीजनांना एकमेकांशी संवाद साधण्यात परमावधीचं सुख मिळतं. आणि ज्या वेळेला ते एकमेकांपासून दूर असतात आणि तो विरह त्यांना छळत असतो, त्यावेळी त्यांची संवादाची भूक ते कोणातर्फे तरी एकमेकांना संदेश पाठवून भागवत असतात. ज्या वेळेला संपर्कसाधनंच उपलब्ध नव्हती, त्यावेळेला वाटेच्या वाटसरूला सुद्धा विनंती केली जायची, की एवढा माझा संदेश त्याच्यापर्यंत नेऊन पोचव बरं!
राधा ना बोले ना बोले ना बोले रे
घूँघट के पट ना खोले रे
हा सुद्धा एक प्रकारचा संवादच आहे. ज्या वेळेला राधा रुसलेली असते तिला आपल्या सख्याचा भलताच राग आलेला असतो. त्या वेळेला ती बोलत नाही. आपल्या माथ्यावरचा घुंगट ती काढतच नाही. त्याला चेहरा दाखवत नाही. आपला प्रियकरवरचा राग, रुसवा, त्याने आपली विनवणी करावी, मनधरणी करावी, यासाठी असलेली तिची इच्छा, हे सगळं ती चक्क न बोलता प्रकट करत असते. मनकवडे प्रियकर हे समजून घेऊ शकतात. मग जर का ती संदेश पोहोचवू शकते आणि तो समजूनही घेऊ शकतो तर याला संवाद नाही का म्हणायचं? आहे की नाही गंमत. म्हणजे न बोलता सुद्धा संवाद होऊ शकतोच की. म्हणजे संवादाचं माध्यम दरवेळेला शब्दच असतात असं काही नाही. हातवारे, हावभाव, रुसवा, राग, हालचाली, अगदी आदळआपट आणि पाठ फिरवून निघून जाणं, या सर्व गोष्टी संवादाचाच एक अविभाज्य भाग असतात. फार काय? अहो देवळात उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीशी आपले समर्थ रामदास बोलतात, संत नामदेव बोलतात आणि देव त्यांच्याशी संवाद साधतात ते काय उगीचच? संत रामदास तर कमरेवर हात ठेवून नि:शस्त्र उभ्या असलेल्या विठोबारायांना प्रश्न विचारतात.
येथे का रे उभा श्रीरामा? मनमोहन मेघश्यामा!
चापबाण काय केले? कर कटावरी ठेविले? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे
का बा धरीला अबोला? दिसे वेष पालटला!
आपल्या रामरायालाच ते हक्काने विचारतात, की माझ्याशी अबोला का धरलास? बोलत का नाहीस? म्हणजेच त्यांना संवाद साधायचा आहे. आणि तो साधला जात नाहीये म्हणून कळवळून ते विचारतात की रामराया माझ्यासोबत अबोला का बरं धरला? संवादाचं केवढं लडिवाळ रूप आहे ते! अगदी ज्योत्स्ना भोळे ‘देवा बोला हो माझ्याशी’ चा असा काही सुरेल हट्ट धरतात की देवाला बोलावंसं वाटेलच.
पण संवादाचं मूळ ज्यांना कळलं की आपली ज्ञानोबा माऊली मात्र अतिशय आर्जवाने म्हणते,
शब्देविण संवादु दुजेविण अनुवादु
हे तव कैचे निगमे परिही परतें बोलणे खुंटले
वैखरी कैचेनि सांगे..
जिथे शब्देविण संवादु होतो तेथे प्रत्यक्षातलं बोलणं खुंटणारच. वाणीतली सर्वोत्तम वाणी जिला परावाणी म्हणतात. परेहि परतें म्हणजे तिच्याही पलीकडचं आमचं मैत्र आहे. तिच्याही पलीकडचा आमचा सदाचा संवाद आहे. तर वैखरी काय सांगणार? मोठ्याने बोलायच्या गोष्टी नसतात या! ये हृदयीचे ते हृदयी घालायला हाच शब्देविण संवादु सर्वात प्रभावी मार्ग असतो बरं!
-अॅड. अपर्णा परांजपे प्रभु








