वृत्तसंस्था / टोरँटो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेचा द्वितीय मानांकीत टेलर फ्रित्झने कॅनडाच्या गॅब्रीयल डायलोचा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे झेकच्या जेरी लिहेका, चौथा मानांकीत बेन शेल्टन, रशियाचा आंद्रे रुब्लेव यांनीही चौथ्या फेरीत स्थान मिळविले.
पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात फ्रित्झने डायलोचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. फ्रित्झ आणि झेकचा लिहेका यांच्यात चौथ्या फेरीचा सामना होईल. झेकच्या लिहेकाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या 15 व्या मानांकित फिल्सचा 3-6, 6-3, 6-4, अमेरिकेच्या चौथ्या मानांकीत बेन शेल्टनने आपल्याच देशाच्या नाकाशिमाचा 6-7 (6-8), 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला. शेल्टनचा चौथ्या फेरीतील सामना इटलीच्या कोबोलीशी होणार आहे. रशियाच्या आंद्रे रुब्लेवने इटलीच्या सोनेगोचा 5-7, 6-4, 6-3, अमेरिकेच्या सातव्या मानांकीत टिफोईने ऑस्ट्रेलियाच्या व्हेकीकचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनेर, स्पेनचा अल्कारेझ, सर्बियाचा जोकोविच आणि ड्रेपर यांनी आपला सहभाग दर्शविलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या डी. मिनॉरने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या ओकोनेलने दुखापतीमुळे तिसऱ्या फेरीतील सामन्यातून माघार घेतल्याने मिनॉरला चौथ्या फेरीसाठी पुढे चाल मिळाली.









