बेळगाव : अलीकडे मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. आता पूर्वीप्रमाणे 60 नंतर नव्हे तर तरुण वयातसुद्धा मधुमेह होऊ लागला आहे. शिवाय लहान मुलांनाही मधुमेहाने ग्रासले आहे. मधुमेहींनी वेळेवर औषधोपचार घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय त्यांनी त्यांच्या पायाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मधुमेहामुळे होणारा पायांचा आजार किंवा गुंतागुंत पॅन्सरपेक्षाही गंभीर आहे. 25 टक्क्यांहून अधिक मधुमेहींना न्युरोपॅथी व्हॅक्स्युलोपॅथी आणि इम्युनोपॅथीचा त्रास होतो. ज्यामुळे पायावर व्रण येतात व गँगरींग होऊन कधी कधी पाय काढण्याची वेळ येते. मधुमेहींना पायाच्या वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे कधी तरी तीव्रपणे नख टोचणे, काटा बोचणे किंवा इन्फेक्शन होणे हे प्रकार त्यांना लगेच जाणवत नाहीत. म्हणूनच मधुमेहींनी पायाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात होणाऱ्या समस्या
मधुमेहींनी अनवाणी चालणे किंवा कडक उन्हात ठेवलेल्या पादत्राणांचा वापर करणे, तापलेल्या टेरेसवर अथवा गच्चीवर चालणे, मंदिरांच्या उष्ण अशा पायऱ्यांवर अनवाणी चालणे शक्यतो टाळावे. अशा ठिकाणी अनवाणी चालल्यास पायाला जखमा होतात.
हिवाळ्यात होणाऱ्या समस्या
मधुमेहींना घाम येत नसल्याने पाय कोरडे पडतात, खाज सुटते. अशावेळी मधुमेही घरात असलेले व डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतेही मलम लावतात व वेदना वाढू शकतात. पायांना खाज सुटण्यापासून रोखण्यासाठी रोज मॉईश्चरायझर लावावे.
पावसाळ्यात पाय कोरडे ठेवा
ओल्या सॉक्समुळे किंवा ओल्या पादत्राणांमुळे पायाच्या बोटांच्यामध्ये बुरशीजन्य संसर्ग सुरू होतो. अशावेळी अॅन्टीफंगल पावडर लावून पाय कोरडे ठेवावेत. पावसाळ्यात पाय ओले ठेवण्याचे टाळावे.
– डॉ. सुनील व्ही. करी-डायबेटीक फूट सर्जन, सौ. मंदाकिनी मेमोरिअल क्लिनिक, हुबळी









