गडहिंग्लज येथे प्रदान सोहळा उत्साहात
प्रतिनिधी /बेळगाव
तरुण भारतचे पत्रकार रमेश हिरेमठ यांना श्रमिक पत्रकार संघ व सुभाष धुमे प्रतिष्ठान-गडहिंग्लजतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गडहिंग्लज येथे मंगळवारी सकाळी व्ही. व्ही. शिंदे सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आजरा साखर कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे, अध्यक्ष म्हणून माजी आमदार श्रीपतराव शिंदे उपस्थित होते. व्यासपीठावर सुभाष धुमे, अनंत पाटील, साताप्पा कांबळे, मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण उपस्थित होते.
श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते रमेश हिरेमठ यांना संविधान प्रतिमा, रोख रक्कम, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यावरण कार्यकर्ते अनंत पाटील यांनाही गौरविण्यात आले. यावेळी बोलताना श्रीपतराव शिंदे म्हणाले, पत्रकारांसमोर अनेक प्रलोभने असताना त्यांना बळी न पडता काम करणारे पत्रकार दुर्मीळ आहेत. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांसमोर होत असल्याने त्यांना प्रेरणा मिळेल. हा देश धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे.
सुनील शिंत्रे म्हणाले, वृत्तपत्रे समाजात जागृती करतात. सोशल मीडियाने वृत्तपत्रांना आव्हान दिले तरी पत्रकार आपले काम चोख बजावत आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करणे आपली जबाबदारी आहे, असे नमूद केले. यावेळी सत्कारमूर्तींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सुभाष धुमे यांनी, पत्रकारांनी ठरविले तर ते झटपट श्ा़dरीमंत होऊ शकतात. परंतु हिरेमठ त्याला अपवाद आहेत. समाजात उत्तम कार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रतिष्ठान नेहमीच गौरव करत असते, असे नमूद केले. प्रारंभी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुऊवात करण्यात आली. डी. व्ही. चव्हाण यांनी स्वागत केले. शिक्षक अराडे यांनी सूत्रसंचालन केले.









