वृत्तसंस्था/ चेन्नई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व सध्या एम. एस. धोनी करीत आहे. पण कर्णधार धोनीने नजीकच्या काळात आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचे ठरविले असल्याने त्याचा उत्तराधिकारी म्हणून इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स योग्य ठरेल, असे मत इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीने व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या फ्रँचाईजींनी अष्टपैलू बेन स्टोक्सला मोठी रक्कम मोजून खरेदी केले होते. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात स्टोक्सकडून फलंदाजीत निराशा झाली आहे. त्याने दोन सामन्यातून केवळ 15 धावा जमविल्या तर त्याने गोलंदाजीत केवळ एक षटक टाकले आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत स्टोक्सकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपविल्यानंतर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये निश्चितच दर्जेदार कामगिरी केल्याचे जाणवते. स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने 12 पैकी 10 कसोटी सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपरकिंग्जला धोनीनंतर बेन स्टोक्स हा त्याचा योग्य उत्तराधिकारी ठरेल, असा विश्वास मोईन अलीने व्यक्त केला आहे.
स्टोक्समध्ये निश्चितच कर्णधाराचे गुण असून तो संघातील इतर खेळाडूंना आपल्यासोबत घेऊन जाण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये निश्चितच जाणवते. चेन्नई सुपरकिंग्ज संघातील ऋतुराज गायकवाड हा नजीकच्या काळात जागतिक दर्जाचा फलंदाज म्हणून गणला जाईल, असेही मोईन अलीने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा जमविल्या होत्या. आता 2023 च्या आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅपसाठी तो आघाडीवर आहे. त्याने दोन सामन्यात 149 धावा जमविल्या असून भविष्यकाळात कदाचित त्याच्याकडे चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व सोपविले जाईल, असे भाकित मोईन अलीने केले आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत चारवेळा आयपीएल क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. मात्र, चेन्नई संघाला 2023 च्या आयपीएल स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला आहे.









