वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्वचषक विजेता माजी कर्णधार एम. एस. धोनीच्या भारतीय क्रिकेटमधील भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘बीसीसीआय’ने त्याची 7 क्रमांकाची जर्सी ‘निवृत्त’ करण्याचा म्हणजे न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी 2019 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविऊद्ध देशासाठी शेवटचा खेळला होता. त्याने 15 ऑगस्ट, 2020 रोजी निवृत्तीची घोषणा केली आणि तेव्हापासून इतर कोणत्याही खेळाडूने 7 क्रमांकाचा शर्ट परिधान केलेला नाही.
महान सचिन तेंडुलकरची 10 क्रमांक असलेली जर्सी देखील 2013 मध्ये त्याने निवृत्ती घेतल्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर वगळता इतर कोणत्याही खेळाडूला परिधान केलेली नाही. शार्दुलने 2017 मध्ये श्रीलंकेविऊद्धच्या त्याच्या एकदिवसीय पदार्पणावेळी 10 क्रमांकाची निवड केली होती. परंतु त्याबद्दल सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ‘ट्रोल’ करण्यात आले होते. तेव्हापासून कोणीही 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेली नाही.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने गुऊवारी हा निर्णय घेतला. ‘धोनी हा एक दिग्गज खेळाडू आहे. भारतीय तसेच जागतिक क्रिकेटमध्ये त्याचे योगदान मोठे आहे. त्याच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने सातवा क्रमांक न वापरण्याचा निर्णय घेतला आहे, असे शुक्ला यांनी सांगितले. महान खेळाडूच्या क्रमांकाची जर्सी वापरणे बंद करण्याच्या घटना इतर खेळांतही घडलेल्या आहेत. बास्केटबॉल दिग्गज मायकेल जॉर्डनच्या निवृत्तीनंतर शिकागो बुल्सने त्याच्याकडून परिधान करण्यात येणारी 23 क्रमांकाची जर्सी वापरणे बंद केले होते.
भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक हा 2020 मध्ये धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर 7 क्रमांकाची जर्सीही निवृत्त करावी अशी मागणी करणाऱ्या सुरुवातीच्या काही व्यक्तींपैकी एक होता. न्यूझीलंडविऊद्धच्या वर्ल्ड कपच्या त्या उपांत्य सामन्यात धोनी व कार्तिक हे दोघेही बरोबर खेळले होते. ‘आशा आहे की, बीसीसीआय पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये 7 क्रमांकाच्या जर्सीला निवृत्त करेल’, असे कार्तिकने त्यावेळी ‘पोस्ट’ केले होते.









