वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. म्हणजेच आता धोनी ग्राहकांना ‘एसबीआय’च्या योजनांची माहिती देताना दिसणार आहे. स्टेट बँकेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून धोनी विविध मार्केटिंग आणि प्रचारात्मक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी माहिती यासंदर्भात बँकेने शेअर केली आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनीही धोनीच्या ‘एसबीआय’मधील एन्ट्रीबाबत माहिती दिली. धोनीसोबत केलेल्या सहकार्य कराराद्वारे आम्ही विश्वास, सचोटी आणि अतूट समर्पणाने देश आणि ग्राहकांची सेवा करण्याची वचनबद्धता मजबूत करण्याचे ध्येय निर्धारित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









