तडतडणारे ताशे, दणाणणारे ढोल, ध्वजपथकाचे आकर्षक पदलालित्य : ध्वजधारी युवतींचाही वाढता सहभाग
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरते ते ढोलताशा व ध्वजपथक. बेळगावमध्ये अनेक ढोलताशा पथके असून वेगवेगळ्या तालात त्यांनी अतिशय सुरेख असे वादन केल्यामुळे देशाच्या विविध कोपऱ्यात हे वादन पोहोचले. यावर्षीही ढोलताशांचा गजर चित्ररथ मिरवणुकीत घुमणार असून यासाठी ढोलताशा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील खुल्या मैदानांवर सराव केला जात असून शनिवारी चित्ररथ मिरवणुकीत त्याचा आवाज घुमणार आहे. यावर्षी शनिवार दि. 27 रोजी बेळगाव शहरात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. पारंपरिकता जपत काही तरुणांनी आठ-दहा वर्षांपूर्वीपासून पुणेरी पद्धतीने ढोलताशा वादन सुरू केले. बेळगावमध्ये याला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला एक-दोन असणारी ढोलताशा पथकांची संख्या आता आठ ते दहावर पोहोचली आहे. शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीवेळी शेकडोंच्या संख्येने तडतडणारे ताशे आणि घुमणारे ढोल बेळगावच्या मिरवणुकीत पाहता येतात. त्यांच्याच साथीला हातात भगवे ध्वज घेऊन युवती तालबद्ध पदलालित्य सादर करतात. कोरोनापूर्वीच्या काळात बेळगावमध्ये अनेक ढोलताशा पथके होती. परंतु, कोरोनानंतर मात्र तरुणाईचा ओढा काहीसा ओसरला. त्यामुळे सध्या मोजकी सहा ते सात ढोलताशा पथके शिल्लक राहिली. यामध्ये नरवीर प्रतिष्ठान, वज्रनाद, मोरया, आरंभ, धाडस, कडोली येथील शिवमुद्रा, वडगाव-जुने बेळगाव येथील शिवगर्जना ही मोठी ढोलताशा पथके सराव करत आहेत. त्यामुळे यावर्षीच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतही ढोलताशांचा आवाज घुमणार आहे.
ध्वजपथके वाढवताहेत शोभा
मागील काही वर्षांपासून ढोलताशा पथकांसोबतच युवतींची ध्वजपथके शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होत आहेत. नरवीर प्रतिष्ठान संचालित रणरागिणी ध्वजपथकामध्ये तर तब्बल शंभर ते दीडशे ध्वजधारी युवतींचा सहभाग असतो. एकाच रंगाचे पोशाख आणि हातात भगवा ध्वज घेऊन एकाच ठेक्यामध्ये उत्कृष्ट पदलालित्य सादर केले जाते. त्यामुळे चित्ररथ मिरवणुकीची शोभा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच युवतींनाही चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होता येत आहे.
वेगळ्या प्रयोगाचा प्रयत्न
बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ढोलताशा व ध्वजपथकांची लगबग सुरू झाली आहे. नरवीर प्रतिष्ठानचे वादक बालिका आदर्श शाळेच्या मैदानावर सराव करीत आहेत. नरवीरचे हे दहावे वर्ष असल्याने एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न आम्ही केला असून चित्ररथ मिरवणुकीदिवशी तो बेळगावकर नागरिकांना पाहता येईल, असे नरवीर प्रतिष्ठानचे आशुतोष कांबळे यांनी सांगितले.
नाविन्यता आणणार
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी महिनाभरापासून मेहनत घेत आहे. जुना धारवाड रोड परिसरातील ओव्हरब्रिजखाली दररोज दोन-तीन तास वादक सराव करीत आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन ताल तसेच शिवाजी महाराजांचा गौरव करणारी ‘गारद’ यासाठी तयारी केल्याचे मोरया ढोलताशा व ध्वजपथकाचे सागर हेगडे यांनी सांगितले.









