फूल व भाजी विव्रेत्यांना ढवळीकर ट्रस्टतर्फे छत्र्यांचे वितरण
जगन्नाथ मुळवी /मडकई
अतुल्य कार्यकर्तृवाचे हिमशिखर भासावे असे मानवकल्याणाचे कार्य करणारा ‘माधवराव ढवळीकर ट्रस्ट’ प्रत्येक वर्षी समाजमनाची नाडी ओळखून कार्य करीत आहे. मानवतेच्या धर्माचे पालन करताना ढवळीकर ट्रस्टने बहुजन समाजाच्या भावना समजून उमजून घेतल्या. मानवाच्या जीवनाला उभारी देणे, हे परम कर्तव्य मानून त्या अनुषंगाने ट्रस्ट काम करीत असल्यामुळे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाच्या विश्वासास ढवळीकर ट्रस्ट पात्र ठरल्याच्या प्रतिक्रिया फुल विक्रेत्यांनी व्यक्त केल्या..! अंत्रुज महालातील अनेकजणी विविध मंदिराच्या बाजूला बसून फुले व फळे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. व्यावसायासाठी उघड्यावर बसून स्वत:च्या कुटूंबाचा उदर निर्वाह करीत असलेल्या या फुलविक्रेत्यांची दखल माधवराव ढवळीकर ट्रस्टने घेतली. ऊन पावसापासून त्यांना आसरा मिळावा म्हणून उभ्या छत्र्यांचे वाटप ट्रस्टचे ट्रस्टी मिथील ढवळीकर व मंत्री सुदिन ढवळीकर त्यांनी केले आहे. पावसाळ्यात हंगामी काकड्या, रताळे, वाल अशा अनेक पालेभाज्या उघड्यावर बसून त्या विक्री करतात. तर काही जणी मंदिराजवळ बसून फुलांचे हार विकण्याचा पारंपारिक व्यवसाय करीत आहेत. अशा कित्येक व्यावसायिकांना ऊन पावसाचा मारा सहन करत आपल्या व्यावसाय करावा लागतो. अशा सर्वच घटकांना माधवराव ढवळीकर ट्रस्टने उभ्या छत्र्यांचे वाटप करुन बहुजन समाजातील तळागाळातल्या छोट्या व्यावसायिकांचे हित जपलेले आहे.
दैनंदिन जीवनात व्यस्त असलेले गिऱ्हाईक गाडीत बसूनच फुलांचे हार व पालेभाज्याच्या किंमती संबंधी चौकशी करतात. अशावेळी बिचाऱ्या विक्रेत्यांना भर पावसात धावत गाडीजवळ जाऊन वस्तुंची किमंत सांगावी लागते. पावसात भिजल्यामुळे सर्दी खोकला झाल्याने व्यवसाय बंद ठेवावा लागतो आणि कमावलेली तुटपुंजी औषध पाण्यावर खर्च करावी लागते. एकुण या सर्व प्रकारातून त्यांना नुकसानी सोसावी लागते. म्हणूनच छत्र्या वितरणाच्या योजनेची स्तुती प्रतिक्रीयांतून फुलकारांनी व्यक्त केल्या. चतुर्थी व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर याच व्यावसायिकांना चालना देण्यासाठी ट्रस्टतर्फे आमदार सुदिन ढवळीकर व मिथील ढवळीकर आर्थिक साहाय्य करीत असतात. व्यावसायिकांमधील आपापसातील तंटे मिटवून शांततेत व्यवसाय करण्यासाठी त्यांचे सदैव प्रयत्न असतात. ढवळीकर ट्रस्टतर्फे समाजोपयोगी अनेक योजना कार्यान्वीत आहेत. मात्र पावसाळ्यात पारंपारिक व्यावसाय करणाऱ्या या फुले व फळ विक्रेत्यांची दखल घेऊन छत्र्यांच्या माध्यमातून त्यांना आसरा मिळाल्यामुळे या कार्याचे पडसाद अंत्रुज महालात उमटलेले आहेत. ट्रस्टचे ट्रस्टी व युवा नेते मिथील ढवळीकर यांना या फुलकारांनी सद्गतीत अंतकरणाने धन्यवाद दिले. राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या मिळवताना बरेच सोपस्कार पूर्ण करावे लागतात. मात्र ढवळीकर ट्रस्टच्या योजनेसाठी कुठलेचे सोपस्कार नसल्याने त्या सहज उपलब्ध होत असतात.
कर्करोगाच्या वाढत्या संख्येमुळे मन खिन्न -मंत्री ढवळीकर
फुले विक्रेत्यांची समस्या निकालात काढली तरी विद्यमान स्थितीत गोव्यात वाढणारी स्तन कर्करोगाची संख्या पाहुन मन खिन्न होत असल्याची प्रतिक्रिया मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी व्यक्त केली. ट्रस्टतर्फे सर्वात आधी वाडी तळावलीत एक दिवशीय शिबीर घेऊन जागृती घडवून आणली. त्यात तज्ञ डॉक्टर्सना आमंत्रित करुन महिलांना या रोगाविषयी सल्ला देण्यात आला. फर्मागुडीत ढवळीकर ट्रस्ट व आयएमए फोंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महिन्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस ठरवून कर्क रोगाची चाचणी करण्याचा ट्रस्टतर्फे हाती घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याची माहिती मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे.
ढवळीकर ट्रस्टचे समाजोपयोगी कार्य
आरोग्य विषयक अनेक शिबिरे घेण्यात आली असून त्यात चष्म्यांचे वाटप, मधुमेह, रक्तदाब निदान आदींचा समावेश आहे. कलाकार व क्रीडापटूंना साहित्य देण्यात आले. त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून ट्रस्टने सदोदीत प्रयत्न केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्य अधोरेखीत करताना ते म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, त्यांचा महागडा प्रवेश शुल्क, घटप्रभा, खानापूर, बेळगांव या भागात पाठवून त्यांना उच्च विद्याविभूषीत करणे असे अनेक विविध उपक्रम ट्रस्टतर्फे हाती घेण्यात आले आहेत. या सर्वांपेक्षा स्तन कर्करोगाची सर्वांची चाचणी करुन आरोग्य चांगले राहावे हेच सध्या ट्रस्टचे ध्येय आहे.









