माजी मंत्री शशिकांत नाईक यांची मागणी : अन्यथा जनआंदोलन : कळसा-भांडुरा प्रकल्प कार्यान्वित केल्यास हुबळी-धारवाडला फायदा
बेळगाव : बेळगाव, संकेश्वर आणि हुक्केरी तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राकडे वळविले जात आहे. त्यामुळे भविष्यात या शहरांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागणार आहे. कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेला हा प्रकल्प तातडीने थांबवावा अन्यथा जनआंदोलन हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठ्यासाठी 80 किलोमीटर लांबीची जलवाहिनी घातली जात आहे. त्यामुळे चिकोडी, गोकाक तालुक्यातील शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही याचा धोका आहे. तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी केली आहे.
म्हादई, कळसा-भांडुरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास त्याचा फायदा हुबळी-धारवाड विभागाला होणार आहे. मात्र, हिडकल जलाशयाचे पाणी धारवाडकडे कशासाठी वळविले जात आहे? असा प्रश्नही त्यांनी केला. तसेच सौंदत्ती येथील नवलतीर्थ जलाशयातून धारवाडला पाण्याचा पुरवठा केला जातो. या नवलतीर्थ जलाशयातील गाळ काढून पाणीसाठा वाढवावा आणि तेथूनच अतिरिक्त पाणी धारवाडला द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हिडकल जलाशयाची 51 टीएमसी इतकी पाण्याची क्षमता आहे. या जलाशयातून बेळगाव, हुक्केरी, संकेश्वर आणि हुक्केरी तालुक्यातील शंभरहून अधिक गावांना दैनंदिन पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, या जलाशयातून आता धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे बेळगाव, हुक्केरी आणि संकेश्वर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. शिवाय शेतीतील पाण्यासाठीही परिस्थिती गंभीर बनणार आहे. हा प्रकल्प तातडीने मागे घ्यावा, अन्यथा विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन छेडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.









