अखिल कर्नाटक रयत संघाची मागणी
बेळगाव : धारवाड-बेळगाव नवीन रेल्वेमार्ग पिकाऊ जमिनीतून केला जाणार असल्याने संबंधित शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. हा रेल्वेमार्ग नापीक जमिनीतून करावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे, या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघाने सोमवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडले. या नवीन रेल्वेमार्गामुळे नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, के. के. कोप्प, गुर्लगुंजी, बागेवाडी, एम. के. हुबळी आदी परिसरातील पिकाऊ जमीन जात आहे. त्यामुळे हा मार्ग नापीक जमिनीतून करावा यासाठी रेल्वे विभागाकडेही मागणी करण्यात आली होती. या मार्गामुळे सुपीक जमिनीबरोबर शिवारातील 250 हून अधिक कूपनलिकाही नष्ट होणार आहेत. विशेषत: या शेतीमध्ये भात, ऊस, कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिके घेतली जातात. मात्र या रेल्वेमार्गामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. खानापूर तालुक्यातील गोरगरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या मार्गासाठी दोनवेळा सर्व्हे झाला आहे. अशा परिस्थितीत हा मार्ग पडीक जमिनीतूनच करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.









