के. अण्णामलाई सहप्रभारी ः विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वेगवान तयारी
बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये यावषी होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. भाजपच्यावतीने शनिवारी यासंबंधी निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनानुसार, भाजपच्या तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष के. अण्णामलाई या निवडणुकांसाठी पक्षाचे सहप्रभारी असतील.
कर्नाटकमध्ये एप्रिल-मेमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस व निजद या दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. याच राजकीय रणधुमाळीमध्ये भाजपने राज्यातील निवडणूक प्रभारी म्हणून अभ्यासू आणि ज्येष्ठ असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती करत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागील वषी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसह अनेक निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपने मोठय़ा मताधिक्क्मयाने आपला विजय कायम ठेवला होता. पक्षाचे माजी सरचिटणीस असलेल्या प्रधान यांनी 2013 च्या कर्नाटक, बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2015 च्या आसाम आणि 2018 च्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ते भाजपचे प्रभारी होते. त्यांच्याकडून एक कार्यक्षम नेता म्हणून राज्यात संघटन करावे आणि स्थानिक घटकातील अंतर्गत समस्या दूर कराव्यात, जेणेकरून दक्षिणेकडील या महत्त्वाच्या राज्यात सत्ता टिकवण्यासाठी पक्षाला जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे.
कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे जिथे भाजपचे सरकार आहे. पक्षाने जुलै 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या जागी बसवराज बोम्माई यांना मुख्यमंत्री बनवून नेतृत्वात बदल केला होता. येडियुराप्पा सत्तेत नसले तरी त्यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश असल्यामुळे त्यांचा या निवडणुकीत प्रभाव कायम राहणार आहे.









