काही वन कर्मचारी बिनधास्त; नागरिकांचे शर्थीचे प्रयत्न
धारबांदोडा : धारबांदोडा तालुक्यात अनेक ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या वन विभागाचे कर्मचारी, सरपंच, पंचसदस्य व विविध संघटनाचे कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणी हॅलिकॉप्टरद्वारे पाणी फवारणी करण्यात आली. गेल्या आठवडयापासून धारबांदोडा तालुक्यात आग लागण्याच्या प्रकारात वाढ झाली असून वन कर्मचाऱ्यांची बरीच दमछाक होत आहे. धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील सिद्ध डेंगरावर लागलेली आग आटोक्यात आली असतानाच रविवारी संजीवनी साखर कारखान्यासमोरच्या डोंगरावर आगीचा भडका उडाला. ही आग पिळ्यो, तिस्क येथील भूमिका मंदिरापर्यंत पोचली आहे.
ही आग विझवण्यासाठी सहायक वन संरक्षक विश्वास चोडणकर व उपवनपाल संतोष फडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक गावस, पंच कविता गावकर व इतर पंचसदस्य, स्थानिक युवक व हिंदवी स्वराज्य संस्थेचे कार्यकर्त्यानी आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला. वन कर्मचारी व स्थानिक मिळून सुमारे शंभर लोक ही आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. विनायक गावस यांनी चांगले सहकार्य केले असून आग नियंत्रणात आणल्याने विश्वास चोडणकर यांनी सांगितले. पोखरमळ काले ते माटोजे, शिगांव कुळे या वन्यजीव भागात लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असताना ही आग मायडा शेळींक येथेपर्यंत पोहोचली आहे. येथे लागलेली आग नियंत्रणात आली असून वन कर्मचारी व दुधसागर ऑपरेटर असोसिएशनच्या सदस्यानी चोख भूमिका बजावली. पोखरमळ, काले व माटोजे येथील आग विझवण्याचे काम सुरू असून यात कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच गोविंद शिगावकर, पंचसदस्य अनिकेत देसाई, साईश नाईक, अजय बांदेकर यांच्यासह शिगांव येथील नागरिक सहभागी झाले आहेत. उपवनपाल आनंद जाधव व आरएफओ सिद्धेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझवण्याचे काम सुरू आहे.
फॉरेस्ट गार्ड आपले कर्तव्य विसरल्याची नागरिकांची भावना
दरम्यान आग विझवण्यासाठी नागरिक, सरपंच. पंचसदस्य एकजुटीने काम करीत आहेत, मात्र काही वनधिकारी जंगलात लागलेल्या आगीचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचे वागत असल्याचे पाहून मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनांचे रक्षण करणारेच बफिकीर वागू लागले तर इतरांनी या अधिकाऱ्यांकडून कोणती अपेक्षा करावी अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच काही स्वयंसेवी संस्थाचे सदस्यानाही वन कर्मचाऱ्यातर्फे नाहक त्रस करण्याच्या घटनामुळेही नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे.









