प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा पंचायतीच्या सरपंचपदी विनायक उर्फ बालाजी गांवस यांची तर उपसरपंचपदी सुचिता गांवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पंचायतीवर विनायक गांवस यांच्या पॅनलने वर्चस्व राखले असून गांवस हे तिसऱयांदा सरपंच बनले आहे.
विनायक गांवस यांचे मागील 20 वर्षांपासून धारबांदोडा पंचायतीवर वर्चस्व राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मगो पक्षाच्या तिकिटावर सावर्डे मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रभागातून 81 टक्के मताधिक्क्य मिळवून घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे गांवस यांच्या नेतृत्वाखाली गेली 20 वर्षे धारबांदोडा पंचायतीमध्ये अविश्वास ठराव आणून सरपंच किंवा उपसरपंचपद बदलावे लागलेले नाही. सर्व पंचसदस्यांना विश्वासात घेऊन कार्यभार हाकण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे ही पंचायत कायम स्थिर राहिली आहे. सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व नऊही पंचसदस्यांना सोबत घेऊन पंचायत क्षेत्राचा विकास साधणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व स्थानिक आमदार गणेश गांवकर यांची भेट घेतली असून विकासकामामध्ये त्यांचे निश्चितच सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.









