मुख्य निवडणूक आयुक्तांचे प्रतिपादन : प्रसंगी आम्ही कारवाई करण्यास भाग पाडू
वृत्तसंस्था /हैदराबाद
निवडणूक आयोग स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक आणि प्रलोभनमुक्त निवडणूक करविण्यास तयार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये धनशक्ती (मनी पॉवर) आमच्या रडारवर असणार आहे. याकरता कायदा अंमलबजावणी यंत्रणांना स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. या यंत्रणांनी कारवाई न केल्यास आम्ही त्यांना निवडणुकीत धनशक्ती अन् बळाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी हैदराबादमध्ये केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील 17 सदस्यीय पथक तेलंगणात निवडणूक तयारींचा आढावा घेत आहे. यादरम्यान राजीव कुमार यांनी राजकीय पक्ष, राज्य तसेच केंद्र सरकारचे अधिकारी आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत विधानसभा निवडणुकीवरून बैठक घेतली आहे. आगामी निवडणुका प्रलोभनमुक्त व्हाव्यात हे सुनिश्चित करण्याचा निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
ऑनलाईन देवाण-घेवाणीवरही नजर
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केवळ तेलंगणातच 148 चेकपोस्ट निर्माण केले जातील. तामिळनाडू-आंध्रप्रदेश सीमेवर 35 चेकपोस्ट, तेलंगणा-कर्नाटक सीमेवर 26 चेकपोस्ट, तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर 24 चेकपोस्ट आणि तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर 4 चेकपोस्ट निर्माण केले जाणार आहेत. अशाचप्रकारे सर्वप्रकारच्या ऑनलाईन देवाण-घेवाणीवर देखील आमची नजर राहणार आहे. तसेच पेड न्यूज आणि सोशल मीडियावर नियमांच्या उल्लंघनासंबंधी देखरेख ठेवणार आहोत. तर आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार सीविजल मोबाइल अॅपवर करता येईल आणि याला 100 मिनिटांमध्ये प्रतिसाद दिला जाणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे.
वृद्ध अन् दिव्यांग घरातून मतदान करणार
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये 80 वर्षांपेक्षा अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा स्वैच्छिक असणार आहे.
येत्या काही दिवसात घोषणा
5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची घोषण पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे. 5 ही राज्यांमध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला असल्याने निवडणुकीचे वेळापत्रक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांची घोषणा होताच संबंधित राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.









