मुंबई : धनगर समाजासह राज्यातील सर्व उपेक्षित, वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. भाजपच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळया योजना उपेक्षित, वंचित वर्गापर्यंत पोहचवून दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सोमवारी व्यक्त केला.
धनगर समाजासाठी राज्य अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनांतर्फे फडणवीस यांचा भाजपा प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, धनगर समाजासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजना अभ्यास करूनच तयार करण्यात आल्या आहेत. मेंढपाळांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीच शेळी व मेंढी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व योजनांसाठी जाहीर केलेला निधी उपलब्ध होणार आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याकडे लक्ष न देता या सर्व योजना समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी धनगर समाजाच्या नेत्यांची आहे. पंतप्रधान आवास योजनेतून किमान 25 हजार घरे धनगर समाजातील लोकांसाठी बांधली जातील. आदिवासी पाडे, धनगर वस्त्या, बंजारा तांडे यांच्यासाठी रस्ते बांधण्याची योजना सरकारने आखली आहे.
अधिक वाचा : महापालिकेची निवडणूक होणार तरी कधी..?
भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजासाठीच्या योजना गरजू वर्गापर्यंत पोहचविल्या जातील. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून वंचितांसाठीच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविल्या जातील.








