प्रतिनिधी/मुंबई
सातारा येथे कार्यक्रमात बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल, असे म्हटल्याने सर्वांच्या भवया उंचावल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीतल्या कोणीही धनंजय मुंडे यांचे वक्तव्य नाकारलेले नाही. एकीकडे शिवेनेचे संजय राऊत पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यंत्री असतील असे म्हणत असताना धनंजय मुंडेंच्या वक्तव्यामुळे प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, किमान समान कार्यक्रमावर आधारित स्थापन झालेल्या राज्याच्या महाविकास आघाडीत आता मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा चाललेली दिसत आहेत. राज्यसभा निडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा झाल्यानंतर त्याचे वेगळे परिणाम दिसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार लवकरच कोसळेल, अशी अपेक्षा विरोधक असलेल्या भाजपची होती. मात्र गेल्या अडीच वर्षांत तसे घडले नाही. त्यामुळे हे सरकार त्यांच्याच कर्माने पडेल असे भाजपकडून बोलले जाऊ लागले आणि तसे वातावरण तयार होताना दिसत आहे.
महाविकास आघाडीत महसूलमंत्रीपद काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे असून इतर महत्त्वाची खाती शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे आहेत. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असले तरी तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इतर आमदारांना कमी निधी दिला जातो आणि स्वपक्षीयांना जास्त निधी दिला जातो, अशी आमदारांची ओरड होती. शिवसेनेच्या आमदारांनीही त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मात्र राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्ता टिकवून असलेले मुख्यमंत्री त्याबाबत काही करू शकत नव्हते.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्याबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त करताच त्यांना स्वगृही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात तर नेहमीच धूसफूस चाललेली असते. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे महाराष्ट्रातली स्थिती कथन केली आहे. मात्र त्यावेळी बैठक न झाल्याने ते अधिक काही बोलू शकले नव्हते. येणाया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर काँग्रेसने स्वबळावरच लढविण्याची तयारी चालविली आहे. प्रभाग आरक्षणाच्या सोडतीबाबत तर काँग्रेसने शिवसेनेवर ठपका ठेवला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदावर केलेला दावा महाविकास आघाडीतील धूसफूस अधिक उघड करत आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या वास्तव ते जगूया. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडी सरकारचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे वाटते, यात गैर काय? वाटीतले ताटात आणि ताटातले वाटीत. आपले महाविकास आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदाच्या मागे न लगता सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत हे महत्त्वाचे आहे.
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाने तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र काहींना दिवसाही स्वप्न पडतात, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मनसेचे गजानन काळे यांनी मात्र शिवसेनेला चांगलाच चिमटा काढला आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संजय राऊत आणि शिवसेनेने तुमची धुणी-भांडी करायची का, असा खोचक सवाल केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी बोलणेच टाळले, तर गृहमंत्री राष्ट्रवादीचे दिलीप-वळसे पाटील यांनी प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा आणि प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा हक्क असल्याचे म्हटले आहे.