कोल्हापूर :
मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिकी कराडला वटमुखत्यारपपत्र दिले आहे यापेक्षा आणखी काय हवे. बीड सरपंच हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मुख्य संशयित वाल्मीक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांच्या अडचणी वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे या प्रकरणात कराडसह त्यांच्या सहकाऱ्यांना संरक्षण देत आहेत का असा सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित करत सरकारवर घणाघात केला.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, या व्हिडिओच्या माध्यमातून संतेष देशमुख हत्या प्रकरणाचे कनेक्शन स्पष्ट होत आहे. म्हणूनच मोकाच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल केला त्यापेक्षा खूनाचा गुन्हा नोंद करावा. धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळात मंत्री राहणे देखील बरोबर नाही. मंत्री मुंडे मोठ मोठे बोलतात मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा. जग जाहीर आहे,धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला आपले वटमुखत्यारपत्र दिले आहे यापेक्षा आणखी काय हवे? असे संभाजीराजे म्हणाले. राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे तरी देखील मुंडे यांना मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे आहे का असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आपला प्रश्न आहे, जर मुंडे निर्दोष आहेत तर त्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली असती, मात्र ते दोषी आहेत म्हणूनच त्यांना पालकमंत्री पद दिलेले नाही. हत्या होऊन दीड महिना उलटला तरीही अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत वाल्मीक कराडला संरक्षण देत आहेत. अजूनही वाल्मीक कराडवर गुन्हा नोंद करत नाहीत, सरकारने लवकरात लवकर पारदर्शीपणे खूनाचा गुन्हा दाखल करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
धनंजय मुंडे यांचे नाव घ्यायला सर्वजण सुरुवातीला घाबरत होते मात्र मी सुरुवातीला मुंडेनी राजीनामा द्यावा मागणी केली होती. आता सर्व समोर येत असून आपण केलेली मागणी खरी होत आहे.मुंडे यांना पालकमंत्री पद दिले नाही याचा मला आनंद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे धनंजय मुंडे पालकमंत्री सांभाळणार का? हे येत्या काळात पाहुया.
- गडावर व्यावसायिक अतिक्रमण नको
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जिवंत स्मारके आहेत. या गडकोट किल्ल्यांमुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापन झाली. म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र सरकारने खबरदारी घेणेही आवश्यक आहे.विशाळगडचे अतिक्रमण काढायला आपण गेलो.त्यावेळी आपला कोणताही हस्तक्षेप नसताना आणि कायदा हातात न घेता तेथे अनेक गोष्टी घडल्या. ज्यामुळे वातावरण गढूळ झाले, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली.असे होऊ नये याची सरकारने काळजी घ्यायला हवी.गडावर व्यावसायिक अतिक्रमण राहता कामा नये हे माझे स्पष्ट मत आहे असे संभाजीराजे म्हणाले.








