प्रतिनिधी,कोल्हापूर
Dhananjay Mahadik : गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेला मनमानी व बेकायदेशीर कारभार लेखापरिक्षणाच्या अंतिम अहवालानंतर दूध उत्पादक शेतकरी,संस्था,सभासद यांच्या समोर येईल.यामधून गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.
खासदार महाडिक म्हणाले, गोकुळमध्ये सत्ताधारी मंडळींकडून सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत संचालिक शौमिका महाडिक यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.या तक्रारींची दखल घेवून शासनाकडून गोकुळचे लेखापरीक्षण करण्यात आले.हे लेखापरीक्षण थांबविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले. संचालिका महाडिक यांनी लेखापरिक्षणाची केलेली मागणी आणि शासनाकडून सुरू असलेले लेखापरीक्षण चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने ते थांबविण्यात यावे, यासाठीही त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.मात्र तक्रारींमधील गंभीर मुद्यांची दखल घेत न्यायालयाने सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळली आहे.यामधून गोकुळमध्ये गैरकारभार सुरू आहे याला एकप्रकारे पुष्टीचे मिळाल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,निवडणुकी दरम्यान सत्ताधाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त दोन रुपये दर देण्याचे आश्वासन दिले. दरवाढ देताना ग्राहकांवर या दरवाढीचा बोजा टाकणार नाही असे सांगितले.मात्र सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त दोन रुपयांची दरवाढ देण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना दहा रुपये दरवाढ दिली तर विक्री दरात बारा ते चौदा रुपये वाढ करण्यात आली.तसेच दूध संस्थांना वासाचे दूध परत करणार असल्याचेही आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते.मात्र आज किती संस्थांना वासाचे दूध परत केले हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे,असे आव्हान खासदार महाडिक यांनी दिले. तसेच निवडणुकी दरम्यान दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता न करता सत्ताधाऱ्यांचे नेते,संचालक यांनी दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, ग्राहक यांची फसवणूक केल्याचा आरोप खासदार महाडिक यांनी केला.
दरम्यान,जालना येथील घटना दुर्देवी आहे.या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.चौकशीमधून खरे काय ते उजेडात येईल, असे मडाडिक यांनी सांगितले.
भारत जोडो याचा मतितार्त शून्य…
भारत हा विविधतेने जोडलेला आहेच. त्यामुळे काँग्रेसचे आयोजित केलेली भारत जोडो यात्रा ही मतितार्त शून्य झाला आहे. या यात्रेतून काय निष्पन्न झाले हाच आता प्रश्न निर्माण झाला आहे, असेही महाडिक म्हणाले.
वन नेशन…वन इलेक्शन विधेयक स्वागतार्ह…
वन नेशन… वन इलेक्शन विधेयक आणण्याबाबतची चर्चा सुरू आहे. देशात सतत होत राहणाऱ्या निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागत असते. दरम्यानच्या काळात हाती घेतलेली विकासकामे थांबवावी लागतात. शिवाय निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचाही वापर करावा लागतो. हा सारा प्रकार वन नेशन…वन इलेक्शन या विधेयकामुळे थांबणार आहे, त्यामुळे हे विधेयक स्वागतार्ह असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.








