Dhananjay Mahadik on Kanhaiya Kumar : कन्हैया कुमारला कोल्हापुरात आणून भाजपवर टीका करायला लावली. यातून राज्यात काँग्रेसची अवस्था काय झाली हे लक्षात येतं. कोण आहे कन्हैया कुमार? त्याची काय लायकी आहे? देशाच्या विकासात त्याचे काय योगदान आहे? असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी आज केला. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित कोल्हापुरात काल सद्भावना दौड काढण्यात आली.या कार्यक्रमाला कन्हैया कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी काल भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावर आज धनंजय महाडिक यांनी प्रत्यूत्तर दिले. कोल्हापूर मुंबई ही विमानसेवा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ऑक्टोबर पासून दररोज मुंबईला विमानसेवा सुरू होईल असेही ते म्हणाले.
शरद पवार 25 तारखेला कोल्हापुरात सभा घेणार आहेत. या संदर्भात बोलताना महाडिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली कोल्हापुरातून झाली होती. पवार साहेब हे राज्याचे मोठे नेते आहेत. आपला पक्ष वाढवण्यासाठी पवार साहेब राज्यभर दौरा करत आहेत त्यांना आपल्या शुभेच्छा.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात नव्याने समीकरण घातलं आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. भाजप हा जगभर नावलौकिक असलेला पक्ष आहे. राज्यात 48 जागांची तयारी भाजप करत आहे. त्यात लपवून ठेवण्याचे कारण नाही.कोल्हापुरात दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. फडणवीस यांनी आधीच सांगितलं आहे की पुढील निवडणुका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जाणार आहेत. लोकसभेला हे समीकरण कसे असेल हे माहीत नाही. या दोन्ही जागा शिंदे गटाला गेल्या तर आम्ही त्यांचा प्रचार करू. वेगळा विचार झाला तर पक्षाचा आदेश पाळू. लोकसभेसाठी महाडिक कुटुंबाची तयारी विचाराल तर आमची तयारी आहे पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही. हा सर्वस्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असतो,असेही ते म्हणाले.