प्रतिनिधी,कोल्हापूर, पुणे
पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या मागण्या, समस्यांबाबत नकारात्मक भूमिका घेत उत्तर दिल्याने 9 खासदार संतप्त झाले. प्रश्नच सुटणार नसतील तर बैठक बोलावलीच कशाला? अशी विचारणा करत खासदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तर सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
प्रारंभी विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांनी बैठकीतील विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रवाशांच्या अडीअडचणी आणि समस्या याबाबत सर्वच खासदारांनी वाचा फोडली. खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वप्रथम बंद असलेल्या रेल्वे गाडया कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला. कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, एक्सप्रेस गाड्यांसाठी पूर्वीप्रमाणे वळीवडे थांबा असावा,सहयाद्री एक्सप्रेस सुरू करण्याचा मुद्दा,कोल्हापूर गुड्स यार्डमधील सुधारणा आणि कोल्हापूर-वैभववाडी नवी रेल्वे सुरू करावी,या प्रश्नांकडे महाडिक यांनी लक्ष वेधले.त्यानंतर अन्य सर्वच खासदारांनी सुध्दा रेल्वेविषयक समस्या मांडल्या.खासदार धैर्यशील माने यांनी कोरोनाच्या काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्य़ा सातत्याने मागणी करूनही सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
अधिक वाचण्यासाठी – दुधाचे दर आणखी वाढणार; चेतन नरकेंच स्पष्टीकरण
अनेक स्टेशनवरील स्टॉप (थांबे) बंद करण्यात आले होते.ते प्रवाशांची मागणी असूनही सुरू केलेले नाहीत.पावसामुळे ज्या रेल्वेमार्गावर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याकडेही रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे.वॉटरमॅनेजमेंट केले नसल्याने दरवर्षी सतत होणाऱ्या पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका बसत आहे.त्याकडेही रेल्वे अधिकारी गंभीरपणे पाहत नाहीत,असा आरोप यावेळ खासदार माने यांनी केला. रेल्वे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशी,रूग्ण आणि नोकरदार,व्यावसायिक यांना फटका बसत आहे.वारंवार अडचणी मांडूनही रेल्वे अधिकारी केवळ तांत्रिक कारणे,धोरण,निधी नाही,अशा सबबी सांगून वेळ मारून नेत आहेत,अशा शब्दात संतप्त खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रश्न सुटणार नसतील तर बैठक कशाला बोलविली?
खासदारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बहुतेक प्रश्नांना बगल देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.कोणतेच प्रश्न सुटणार नसतील,तर बैठक बोलावलीच कशाला,असा प्रश्न उपस्थित खासदारांनी उपस्थित केला.जर जनतेच्या प्रश्नांवर उपाय निघत नसतील तर चालणार नाही,असे सांगत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ठणकावले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
रेल्वेचे अधिकारी प्रत्येक प्रश्नावर नकारात्मक भूमिका मांडू लागल्याने सर्वच खासदारांनी तीव्र नाराजी दर्शवली.प्रत्येक खासदार हे 25 ते 30 लाख जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न मांडत असतात.मात्र रेल्वेचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवून,प्रत्येक प्रश्न भिजवत ठेवणार असतील,तर ही बैठक घेतलीच कशाला,असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला.या भूमिकेला अन्य खासदारांनी पाठिंबा दर्शवत थेट बैठकीवर बहिष्कार घातला.इतकेच नव्हे तर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने,रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. जनतेच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने न पाहता,नकाराचा पाढा वाचला जात असेल,तर अशी बैठक घेऊच नका, या भूमिकेशी ठाम रहात,सर्व खासदार बैठकीतून बाहेर पडले.
अधिक वाचण्यासाठी – शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला,परिसरात खळबळ
रेल्वेच्या स्थायी समिती बैठकीत विषय मांडणार ः खासदार माने
पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतील रेल्वे अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेविषयी आपण 20 ऑक्टोबरला दिल्लीत होणाऱ्यां रेल्वेच्या केंद्रीय स्थायी समितीच्या बैठकीत माहिती देणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांन ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
पुणे विभागातील प्रश्न रेल्वेमंत्र्यांकडे मांडणार ः खासदार महाडिक
पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतील अधिकाऱयांनी भूमिका गंभीर आहे. महाराष्ट्रात हा एक चर्चेचा विषय बनलाय. लवकरच रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन, पुणे विभागातील रखडलेले रेल्वेचे प्रश्न मार्गी लावू, प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करून घेऊ, असे खासदार महाडिक यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









