वाहनधारकांची कसरत होणार
धामणे : वडगाव ते धामणे या 5 कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण झाले असले तरी रस्त्याच्या दुतर्फा निकृष्ट दर्जाची मातीचा भराव घालण्यात येत असल्याने आता पावसाळ्यात हे वाहनधारकांना धोकादायक होणार आहे. वडगाव ते धामणे या रहदारीच्या रस्त्याचे गेल्या महिन्यापासून नव्याने डांबरीकरण सुरू झाले. या रस्त्याची उंची 9 इंच ते एक फुटाने वाढली. हा रस्ता अरुंद असल्याने दोन अवजड वाहने या रस्त्याने पास होऊ शकत नाही. त्यामुळे विरुद्ध येणारी अवजड वाहने डांबरी रस्ता सोडून दोन्ही वाहनांच्या एकएक बाजुची चाके डांबरीकरण सोडून बाजूने वाहने घालावे लागत आहे. त्यामुळे अवजड वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा एक फुटाने खड्डा झाला असून सध्या मातीचा भराव घालण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे चिखल होवून वाहने अडकणार असल्याने दुतर्फा तीन फुट बोर्डर घालून लाल माती घाला, असे धामणे ग्राम पंचायतीच्यावतीने या संबंधीत अधिकाऱ्यांची भेट घेवून सांगितले होते. परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा मातीच घालण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे आता या रस्त्याचे डांबरीकरण होवूनसुद्धा पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा चिखलाचे साम्राज्य होवून याचा त्रास वाहनधारकांना होणार हे नक्की.









