दुर्गंधीमुळे नागरिकांची गैरसोय : संबंधितांनी लक्ष देण्याची गरज
वार्ताहर/धामणे
धामणे गावचा मेन रस्ता झाडेझुडपे व कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल या रस्त्याने ये-जा करणाऱ्या सर्वच वाहन धारकांना पडला आह. वडगाव ते धामणे हा पाच कि. मी. चा मुख्य रस्ता असून, वडगाव येथील विष्णू गल्लीतून हा रस्ता धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी पुढे अवचारहट्टीहून येळ्ळूर गावाला जोडला आहे. त्यामुळे याच रस्त्याने या भागातील सर्व वाहनधारक आणि एस. टी. बस सुद्धा दिवसातून 14 ते 15 फेऱ्या मारते. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक या रस्त्याने प्रवास करतात. परंतु वडगाव विष्णू गल्लीपासून या रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहने उभा करुन ठेवली आहेत.
त्यामुळे बस चालकांना व या रस्त्याने जाणाऱ्या चारचाकी वाहनांना वाहन चालविणे अवघड जात असल्याचे वाहन धारकांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे या रोड शेजारी असलेल्या हेस्कॉमच्या केंद्रापासून ते बळ्ळारी नाल्यापर्यंत रस्त्याच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे टाकले जात आहेत. त्यामुळे येथून ये-जा करतांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या सर्वच वाहन चालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडेझुडपे टाकून देत आहेत. त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न या रस्त्याने ये-जा करणाऱ्या सर्व वाहन चालकांकडून ऐकावयास मिळत आहे.
समस्या दूर करण्याची मागणी
निदान आता तरी या रस्त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देवून येथे निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर करून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व नागरिकांतून जोर धरू लागली आहे.









