ग्रामसभेत एकमेव ठराव सर्वानुमते संमत : हर घर नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार
वार्ताहर /धामणे
धामणे ग्राम पंचायतची ग्रामसभा गेल्या चार वर्षानंतर बुधवार दि. 29 रोजी येथील बसवाण्णा मंदिर आवारात आयोजित केली होती. या ग्रामसभेत मोडकळीस आलेली ग्राम पंचायतची जुनी इमारत काढून त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा एकमेव ठराव सर्वानुमते पास झाला. साडेतीन तास चाललेली ही ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष पंडित पाटील होते. तर या ग्रामसभेचे मार्गदर्शक अधिकारी म्हणून पशू संगोपन वैद्यकीय केंद्र येळ्ळूरचे अधिकारी डॉ. शैलेश बागले उपस्थित होते. ग्रामसभेच्या सुरुवातीला ग्रा. पं. पीडीओ उषा एस. यांनी सभेतील विषयांची माहिती देवून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विविध इलाख्याच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या ईलाख्याकडून जनतेला कसे फायदे घेता येतात त्याबद्दल माहिती दिली. यानंतर ग्रामसभेला उपस्थित नागरिकांनी गावातील पिण्याच्या पाणी समस्येबद्दल बरीच चर्चा झाली. पाणी समस्येबद्दल ग्राम पंचायत सदस्य एम. आर. पाटील यांनी स्पष्टीकरण देवून आता गावात सुरू असलेल्या हर घर नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार असून गावातील पाणी समस्या दूर होणार असल्याचे सांगण्यात आले. याचप्रमाणे गावातील विविध नागरी समस्यांबद्दल या सभेत बरीच चर्चा झाली. चर्चेमध्ये ग्रा. पं. सदस्य विजय बाळेकुंद्री, राजू गणाचारी, भरमा चतुर, बाहुबली हणमगौंड, विशाल हणमगौंड यांनी भाग घेतला. या सभेला आरोग्य अधिकारी लोबो आणि इतर इलाख्याचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामसभेस ग्रा. पं. उपाध्यक्ष अशोक पाटील, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा रेमाणाचे, ग्रा. पं. सदस्य कोनेरी बाळेकुंद्री व इतर ग्रा. पं. सदस्य व महिला सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेक्रेटरी मयूर के. एस. यांनी आभार मानले.









