वार्ताहर/धामणे
धामणे ग्राम पंचायतीच्यावतीने गावच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या भोवतालच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली. गावच्या मध्यभागी तलावाच्या सभोवताली काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने विषारी प्राण्यांची भीती येथील नागरिकांत पसरलेली होती. मंगळवार दि. 20 रोजी ग्राम पंचायतीच्यावतीने तलावाच्या भोवतालीच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने गावातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या तलावाचे सुशोभीकरण करण्याची गावकऱ्यांची मागणी होती.
गावच्या मध्यभागी हे मोठे तलाव असून काही वर्षापूर्वी शासनाकडून या तलावाची खोदाई करून तलावाच्या भोवताली पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. परंतु तलावाच्या भोवताली तारेचे कुंपण घालण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे तलावात येथील कांही लोक कचरा टाकत आहेत. त्यामुळे गावच्या मध्यभागी असलेले तलाव म्हणजे उकीरड्याचे स्वरुप येत आहे. आता ग्राम पंचायतने पुढाकार घेवून तलावाच्या भोवती तारेचे कुंपण घालून सुशोभीकरण करावे. कारण गावच्या मध्यभागी तलाव असल्याने गावची शोभा वाढेल.
कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू!
ग्राम पंचायत अध्यक्ष पंडित यांनी या तलावासंदर्भात, या तलावाच्या शेजारील रहिवाशांनी किंवा गावातील कोणीही नागरिकांनी या तलावात किंवा तलावाशेजारी कचरा किंवा कांहीही घाण टाकू नये. कचरा टाकताना सापडल्यास त्यांच्यावर ग्राम पंचायतीच्यावतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कारण त्या ठिकाणी कचरा टाकून आपल्याच गावची शोभा घालवण्यात येत आहे. याची नागरिकांनी दखल घेण्याचे आवाहन केले आहे.









