पणजी : गोव्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, पंकज त्रिपाठी, नुसरत भरूचा, गायक सुखविंदर सिंग, श्रेया घोषाल उपस्थित राहणार असून माधुरी दीक्षित व शाहिद कपूर यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. आंचिमचा उद्घाटन सोहळा श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे 20 रोजी होणार आहे. महोत्सवादरम्यान सुमारे 250 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपारशक्ती खुराना व करिष्मा तन्ना करणार आहेत. सनी देओल, विजय सेतुपती, करण जोहर, सारा अली खान यांच्यासह चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नुसरत भरूचा व श्रेया सरन यांचाही यावेळी कार्यक्रम होईल. माधुरी दीक्षित आपल्या काही निवडक गीतांवर नृत्य सादर करेल.
अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी उद्घाटन कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे. करण जोहर आणि सारा अली खान ‘ए वतन मेरे वतन’ च्या टीमसोबत थ्रिलर ड्रामाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करणार आहेत. या दरम्यान सुखविंदर सिंग चित्रपटाचे प्रेरणादायी शीर्षक गीत गातील. ‘ए वतन मेरे वतन’मध्ये उषा मेहता यांच्या प्रवासाचा उल्लेख आहे ज्यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान एक भूमिगत रेडिओ स्टेशन सुरू केला, ज्याने काही महिने सेन्सॉर नसलेल्या आणि अगदी बंदी असलेल्या बातम्या प्रसारित केल्या. विजय सेतुपती ब्लॅक कॉमेडी ‘गांधी टॉक्स’चा ट्रेलर लाँच करतील. अभिनेत्री नुसरत भरूचा इफ्फी द इंडिया स्टोरी या गाण्यातून नृत्य सादर करणार आहेत. याशिवाय आर आर आर चा ऑस्कर विजेता ट्रॅक नाटू नाटू या गीतावर तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतिनिधित्व करणार आहे.









