पन्हाळा,प्रतिनिधी
Kolhapur News : छत्रपती शिवरायांनी स्वत:ला विकसीत करीत स्वराज्य घडवले तोच आदर्श समोर ठेवून आईसस्टॉक खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी स्वत:ला विकसीत करून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यानी केले.
पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाघबीळ येथील फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी,पन्हाळा येथे आज शनिवार (दि.२६) रोजी राज्यस्तरीय आईसस्टॉक स्पर्धेचे धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाम गजराने शानदार प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी तीस जिल्ह्यातील २५६ खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला आहे.जिल्ह्यात प्रथमच होत असलेली आईसस्टॉक स्पर्धा स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या पन्हाळा येथे होत असल्याचे माने यांनी समाधान व्यक्त करून शरीर आणि मनाची एकाग्रतेवर यासह प्रत्येक खेळात यश मिळते ते खेळाडूंनी आत्मसात करून खेळाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवा असे सांगीतले.
राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य आईसस्टॉक असोसिएननचे अध्यक्ष महेश राठोड यांनी स्वागत केले यावेळी मान्यवरासह आतंरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या यश सरनाईक,प्रविणसह कोळी यांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन प्रसंगी माने यांनी या स्पर्धेचे प्रात्यक्षिक करून अनुभव घेतला.आईसस्टॉक असोसिएननचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब सरनाईक,आईसस्टॉक असोसिएननचे उपाध्यक्ष जयेश भोसले, प्रशिक्षक संदीप भोजकर, खेळाडू उपस्थित होते.
आईसस्टॉक हा खेळ विंटर ऑलिंपिक मधील खेळ असून, हा खेळ बर्फावर तसेच सपाट जमिनीवर सुद्धा खेळला जातो. यामध्ये पुढे लक्ष असते तेथे आपण अचूक पध्दतीने स्टॉक पोहचवावा लागतो.हा खेळ वैयक्तीक व सांघीक अशा सात प्रकारामध्ये खेळला जातो. त्यामुळे जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या सर्धेस क्रिडा प्रेमीत कुतूहल निर्माण झाले आहे.









