वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील ज्येष्ठ अधिकारी असल्याचे भासवून जम्मू-काश्मीरमध्ये तेथील प्रशासनाचा पाहुणचार चार महिने झोडणारा तोतया किरणभाई जगदीशभाई पटेल याच्या विरोधात मनी लाँडरिंगचे प्रकरण लागू करण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित 12 .ठिकाणांवर ईडीने शनिवारी धाडी टाकल्या. या स्थानांमध्ये गुजरातमधील 6 आहेत. पटेल याच्या सहकाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या.
जय सावजीभाई सीतापारा, हार्दिक किशोरभाई चंद्राणा, विठ्ठलभाई मोतीभाई पटेल, अमित पांड्या आणि पियुष कांतीभाई वसीता अशी त्याच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. या धाडी ईडीच्या श्रीनगर येथींल शाखेने टाकल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद, गांधीनगर, मोरबी आणि मेहसाणा येथे या धाडी पडल्या आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपीने स्वत: डॉ. किरण पटेल असल्याचा आव आणला होता. आपण पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयातील मोठे अधिकारी आहोत, अशी बतावणी करत त्याने चार महिने जम्मू-काश्मीर प्रशासनाला झुलवले होते. त्याने अनेकांना लाखो रुपयांना फसविल्याची प्रकरणे आता उघड होत आहेत. त्याच्या विरोधात श्रीनगरच्या निशात पोलिस स्थानकात तक्रार सादर करण्यात आल्यानंतर ईडीच्या श्रीनगर शाखेने त्याच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे.
पटेल हा प्रारंभापासूनच लफंग्या असून त्याने या पूर्वीही तोतया बनून फसवणुकीचे प्रकार केले आहेत. गुजरातमध्ये त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात सहा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरोधात व्यापक चौकशी सुरु करण्यात आली असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.









