पाकिस्तानचे हवाईक्षेत्र बंद झाल्याने उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर प्रतिसादाला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी स्वत:चे हवाईक्षेत्र बंद केले आहे. अशा स्थितीत भारताच्या आंतरराष्ट्रीय विमानांना अरबी समुद्रातून जात मोठा मार्ग निश्चित करावा लागणार आहे. याचमुळे डीजीसीएने सर्व एअरलाइन्ससाठी दिशानिर्देश जारी केले आहेत.
नागरी विमानोड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) स्वत:च्या दिशानिर्देशात 5 मुख्य मुद्द्यांवर भर दिला आहे. यात प्रवाशांच्या सुविधेपासून फ्लाइटमध्ये असलेली केटरिंग सर्व्हिस, कस्टमर सर्व्हिस आणि विभागांदरम्यान समन्वय स्थापित करण्यासारखे निर्देश सामील आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रोखण्यासारखी अनेक मोठी पावले उचलली आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील भारतीय विमानांना स्वत:चे हवाईक्षेत्र वापरण्यास मज्जाव केला आहे. अशास्थितीत युरोप, मध्य आशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जाण्यासाठी आता भारतीय विमानांना अरबी समुद्रावरून जावे लागणार आहे. यामुळे प्रवास अधिक मोठा होणार असून प्रवाशांना अधिक वेळ फ्लाइटमध्ये बसावे लागू शकते. डीजीसीएने स्वत:च्या दिशानिर्देशात पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी स्वत:चे हवाईक्षेत्र बंद केल्याने एअरलाइन्सचा प्रवास प्रभावित होणार असल्याचे नमूद केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलणार असल्याने प्रवास मोठा ठरू शकतो आणि तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते असे डीजीसीएने म्हटले आहे.
प्रवासखर्च महागणार
दीर्घ अंतरामुळे विमानांना इंधन देखील अधिक लागणार आहे. यामुळे देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणे महाग होऊ शकतात. पाकिस्तानचे हवाईक्षेत्र बंद झाल्याने अनेक एअरलाइन्सचे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे.
डीजीसीएचे दिशानिर्देश
-उड्डाणापूर्वी प्रवाशांना पूर्ण माहिती देण्यात यावी.
-प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.
-प्रवाशांच्या आरामाची व्यवस्था, वैद्यकीयविषयक तयारी करा.
-पर्यायी विमानतळांची ओळख पटवा, ग्राहक सेवेवर लक्ष द्या
-आंतरविभागीय समन्वय राखत प्रवाशांना तत्परतेने मदत करा









