वृत्तसंस्था/ शांघाय
येथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्टेज 2 स्पर्धेत भारताचे तिरंदाजपटू ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा व्हेनाम यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात शनिवारी सुवर्णपदक पटकावले. देवतळे आणि ज्योती सुरेखा यांनी अंतिम फेरीत बलाढ्या कोरियाच्या टॉप सिडेड जोडीला पराभूत केले.
गेल्या महिन्यात अँटेलिया येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्टेज 1 स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा व्हेनाम यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यांचे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील हे दुसरे सलग सुवर्णपदक आहे. शांघायमध्ये झालेल्या स्पर्धेतील मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारातील अंतिम लढतीत देवतळे आणि ज्योती सुरेखा यांनी कोरियाची टॉप सिडेड जोडी किम जांगो आणि युहेयुन यांचा 156-155 असा निसटता पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 2023 च्या विश्वचषक तिरंदाजी हंगामाला ज्योती सुरेखाने दमदार प्रारंभ केला असून तिने आतापर्यंत 3 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये अँटेलियातील झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक रिकर्व्ह गटात सुवर्णपदकाचा समावेश आहे. आता बर्लिनमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीनंतर विश्वचषक तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी विजयवाडाची तिरंदाजपटू ज्योती सुरेखा व्हेनाम सज्ज झाली आहे.









