दोघे ग्रामस्थ जखमी
देवरुख प्रतिनिधी
देवरूख पर्शरामवाडी येथे गुरूवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत सीताबाई राघो पर्शराम यांचे घर खाक झाले. 2 तासाच्या अथक पयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र आग आटोक्यात आणताना 2 ग्रामस्थ जखमी झाले. आगीत घरातील कपडे, भांडी, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून 7 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील दप्तरी करण्यात आली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. यावेळी घरातील सदस्य भातझोडणीसाठी शेतात गेले होते.
देवरूख पर्शरामवाडी येथील पर्शराम कुटुंबिय गुरूवारी रात्री शेतात भातजोडणी करत असताना रात्री 8.30च्या सुमारास आकाश पर्शरामला घरामध्ये आग लागल्याचे दिसून आले. कौलारू घर असल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आरडाओरड झाल्याने तत्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्ते व नगर पंचायत कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या सार्वत्रिक पयत्नांना रात्री 10.30च्या सुमारास यश आले. मात्र या भीषण आगीत पर्शराम यांचे कपडे, भांडी, धान्य, शालेय वह्या-पुस्तके, अन्य दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व संसारोपयोगी सर्वच वस्तू खाक झाल्या आहेत. शुकवारी सकाळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये तसेच पोलीस पशासन व महावितरण कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तलाठी बजरंग चव्हाण यांनी पंचनामा केला. यामध्ये पर्शराम यांचे 7 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी पर्शराम कुटुंबियांसमवेत नगरसेविका वैभवी पर्शराम, आनंद पर्शराम व ग्रामस्थ उपस्थित होते.