याप्रकरणी अज्ञातांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
देवरुख : शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या संशयितांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. केतकर यांनी सांगिल्याप्रमाणे संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. ही व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केतकर हे देवरुख– साखरपा मार्गावरून प्रवास करत असताना वांझोळे येथे अज्ञातांनी केतकर यांच्ती वाहनाला धडक देऊन त्यांचे अपहरण केले. त्यांच्याकडील 14 लाखाचे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञातांनी लांबवली. यानंतर केतकर यांना वाटूळ येथील पुलाखाली सोडले. राजापूर पोलिसांच्या मदतीने केतकर देवरुख पोलीस ठाण्यात सुखरूप हजर झाले.
केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी अज्ञातांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरी, देवरुख, लांजा पोलीस पथक कसून तपास करत आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.








