अध्याय नववा
भक्तलक्षणे सांगणारा रिपौ मित्रेऽ थ गर्हायां स्तुतौ शोके समऽ समुत् । मौनी निश्चलधीभक्तिरसंगऽ स च मे प्रियऽ ।। 17 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार शत्रु, मित्र, निंदा, स्तुति, शोक यांचे ठिकाणी समान व आनंदी असणारा मौनी, ज्याची बुद्धि व भक्ति निश्चल असते तो मला प्रिय आहे असं बाप्पा म्हणत आहेत. बाप्पांना प्रिय असलेल्या भक्ताला शत्रू मित्र सारखेच असतात व कुणाबद्दल त्याच्या मनात अपपर भाव नसतो. सर्वांच्यात असलेला ईश्वर त्याचे चित्त शुद्ध झाल्यामुळे स्पष्ट दिसत असतो. कुणी निंदा केली की, माणसाला वाईट वाटतं किंवा स्तुती केली की त्याचा जीव सुखावतो ही झाली सामान्य माणसाच्या मनाची भावना पण हे सुखदु:ख हे विकार भक्ताच्या गावीही नसतात.
निंदा किंवा स्तुती ही नेहमी त्या व्यक्तीचे नाव घेऊन केली जाते पण भक्त स्वत:कडे कोणतंच कर्तृत्व घेत नसतो. त्यामुळे त्याला स्वत:च्या नावाविषयी किंवा शरीराविषयी बिलकुल अहंता व त्याला जोडून येणारे ममत्व नसते. जो साधक असतो तो निंदा ऐकून सावध होऊन वेळीच वर्तणुकीत सुधारणा करतो व स्तुती ऐकून लाजतो व तेथून निघून जातो. सिद्ध मात्र या दोन्ही भावांनी रहित असतो.
आता बाप्पांचा प्रिय भक्त मौनी का असतो ते पाहू. सिद्ध भक्त सतत ईश्वराबद्दल चिंतन, मनन करत असतो म्हणून त्याला मौनी अर्थात मननशील असे म्हणतात. इतर कोणत्याही प्रकारच्या इच्छा, आकांक्षा त्याच्या मनात नसतात. इतकेच काय त्याबद्दलचे विचारही त्याच्या मनात येत नसल्याने त्याबद्दल बोलण्याची त्याला आवश्यकता भासत नसते. ईश्वर एके ईश्वर असा त्याचा खाक्या असतो पण इतरांना ईश्वराबाबत बोलण्यात फारसे स्वारस्य नसल्याने व भक्ताला ईश्वराशिवाय इतर विषय वर्ज्य असल्याने त्याचे आजूबाजूच्या लोकांशी काही बोलणे संभवतच नाही. म्हणून तो लोकांना मौनी वाटतो. प्रत्यक्षात तो मनामध्ये ईश्वरचिंतन करत असल्याने अंतर्मुख झालेला असतो. मनातल्या मनात केलेल्या ईश चिंतनाने त्याला सिद्धी प्राप्त झालेली असते. तिचा उपयोग तो लोककल्याणकारी कार्यासाठी करत असतो.
आता सर्वसंगपरित्याग या भक्ताच्या पुढील लक्षणाविषयी विचार करू. सर्वसंगपरित्याग म्हणजे प्रपंच, त्यातील व्यक्ती यांचा त्याग करायचा नसून त्यातील आसक्ती व त्यामुळे परिस्थितीनुरूप होणारे सुखदु:ख या विकारांचा त्याग होय. प्रपंचाविषयी वाटणाऱ्या आसक्तीतून मनुष्य त्यात गुंतत जातो व त्या त्या प्रसंगानुसार त्याच्या मनात इतरांविषयी प्रेमाची किंवा कटुतेची भावना प्रबळ होते. म्हणून या विकारांच्या त्यागाला महत्त्व आहे. संग याचा आणखी एक अर्थ, नाद असाही घेता येईल. एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या संगाने म्हणजे सततच्या सहवासाने त्या वस्तूचा, व्यक्तीचा माणसाला नाद लागतो. ती वस्तू वा व्यक्ती मिळालीच पाहिजे व ती मी मिळविनच अशा अहंकाराला फुटलेल्या पालवीमुळे मनुष्य भरकटत जातो.
हे सर्व टाळून जो भक्त सर्वसंग त्यागतो म्हणजे ईश्वराशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करतो तो बाप्पांना प्रिय होतो. अमुक एक गोष्ट माणसाने समजून उमजून जरी त्यागली तरी त्या वस्तूबाबत, व्यक्तीबाबत माणसाच्या मनात विचार येत असतातच. हे मनात येणारे विचार जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा खरा त्याग होत नाही. कारण त्या गोष्टी माणसाच्या मनात घर करून बसलेल्या असतात पण भक्त हे ओळखून असल्याने त्याने त्याचे मन सतत ईश्वराच्या नामस्मरणात गुंतवलेले असते आणि त्याने ईश्वराच्या संगाचा ध्यास घेतलेला असतो.
क्रमश:








