अध्याय नववा
भक्तलक्षणांची आपण चर्चा करत आहोत. भगवदगीतेत भगवंतांनी बाराव्या अध्यायात ही लक्षणे सांगितलेली आहेतच. पुढे त्याला धर्मसार असे विशेषणही भगवंतांनी त्याला दिलेले असून हे धर्मसार जो माझे स्मरण करत राहून, नित्य सेवन करेल तो माझा अत्यंत आवडता होईल असे वचन दिले आहे. बाप्पा पुढे म्हणाले, मी कर्ता आहे हा अहंकार व आणि विषयोपभोगांची ओढ नसलेला, कुणाचाही द्वेष न करणारा, सर्वांप्रती करुणा दाखवणारा मला अत्यंत प्रिय आहे. तो केवळ शरीराने जगात वावरत असतो परंतु तो आत्मस्वरूपाला विसरलेला नसल्याने त्याचे चित्त माझ्याठायी सदैव एकवटलेले असते. त्यामुळे त्याला लाभ-हानी, सुख -दु:ख व मान-अपमान सगळे सारखेच वाटते. तो नित्य निरंतर साम्यावस्थेत असतो. आपल्या पूर्व प्रारब्धानुसार सुखदु:खे प्राप्त होतात व ती भोगल्याशिवाय सुटका होत नाही तसेच पूर्वकर्मानुसार मान अपमान होत असतो अशी खात्री असल्याने तो साम्यावस्थेत राहू शकतो. हे सर्व पूर्वकर्माचं फळ असल्याने तो त्यासाठी इतर कुणाला जबाबदार धरून त्यांच्याविषयी द्वेष बाळगत नाही. सुखदु:ख, मान, अपमान हे सर्व देहाशी संबंधित असून आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो आणि आपलं आत्मस्वरूप हे देहात असलेला ईश्वरी अंश आहे हे भक्ताच्या कायम लक्षात असल्याने तो सर्वांच्याकडे समान नजरेनं पाहू शकतो.
आता पुढील श्लोकात बाप्पा अनन्य भक्ताची आणखी लक्षणे सांगत आहेत. ते म्हणाले, यं वीक्ष्य न भयं याति जनस्तस्मान्न च स्वयम् ।
उद्वेगभीऽ कोपमुद्भीरहितो यऽ स मे प्रियऽ ।। 16 ।।
अर्थ- ज्याला लोक घाबरत नाहीत किंवा लोकांना पाहून ज्याला उद्वेग आणि भीती वाटत नाही तसेच क्रोध, आनंद व भीती यांनी जो रहित असतो तो मला प्रिय आहे.
विवरण- बाप्पांना प्रिय असलेल्या भक्ताची लक्षणे आपण पहात आहोत. तो अनन्य भक्त असल्याने त्याला सर्वत्र ईश्वर दिसत असतो. समोर निरनिराळी माणसे, पशुपक्षी, झाडे व निर्जीव पदार्थ पहात असला तरी ही सर्व ईश्वराची रुपेच आहेत याबद्दल त्याला बिलकुल संशय नसतो. ज्याप्रमाणे एकच दूध निरनिराळ्या भांड्यात ठेवले तरी त्याचे मूळ स्वरूप न बदलता प्रत्येक भांड्यातील दुधाचे गुणधर्म सारखेच असतात त्याप्रमाणे प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूत एकच ईश्वरी अंश आहे अशी खात्री असल्याने त्याला सर्व वस्तू एकाच स्वरूपाच्या वाटत असतात. त्यामुळे कुणाकडून काही हिसकावून घ्यावं अशी भावना त्याच्या मनात कधीही येत नाही. म्हणून त्याच्यापासून कुणालाही भीती नसते. तसेच प्रत्येकातल्या ईश्वरी अस्तित्वाची जाणीव त्याला होत असल्याने तो कुणालाही भीत नाही. त्याला जरी सर्वांच्यातला ईश्वर दिसत असला तरी इतरांना म्हणजे त्याच्या आसपास वावरणाऱ्यांना अशी जाणीव असतेच असे नाही. त्यामुळे समोरची मंडळी त्याच्याशी व्यवहारानेच वागत असतात. खूपवेळा याचं साधुत्व त्यांना मान्य नसल्याने, त्याला जास्तीतजास्त त्रास कसा देता येईल हेही पाहिलं जातं. माणसाची एकाग्रता जेव्हा भंग पावते तेव्हा रागारागाने तो ज्या हालचाली करतो त्याला उद्वेग म्हणतात. परंतु अनन्य भक्त उद्वेगरहित असतो. तो ईश्वराप्रति एकाग्र असल्याने आपल्या विरुद्ध कुणी काही बोलत आहे किंवा कृती करत आहे या गोष्टी त्याच्या विचाराच्या परिघाबाहेर असतात. त्यामुळे त्याला कुणाचा राग येत नाही अथवा कुणाची भीती वाटत नाही. त्याला होणारा शारीरिक अथवा मानसिक त्रास त्याला त्याच्या प्रारब्धाचा भोग वाटतो आणि तो भोगून संपवण्यातच आपले भले आहे अशी त्याची विचारसरणी असल्याने तो कुणाचा रागराग करत नाही की, कुणाला कसलीही भीती दाखवत नाही. त्याच्या या लक्षणामुळे त्याला कुणीही भीत नाहीत.
क्रमश:








